सीट बेल्ट परिधान न करता गाडी चालविणाऱ्या कारचालकांना जागेवरच 1000 रुपये दंड आकारण्याचा आदेश राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी जारी केला आहे.
बेळगावसह राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुखांना या आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे. सीट बेल्ट परिधान न करता कार चालविणाऱ्यांना यापूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता. आता दंडाची ही रक्कम 1 हजार रुपये इतकी दुप्पट करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या 19 सप्टेंबर रोजी राज्य सरकारला पत्र पाठवले होते. वाढते अपघात आणि त्यात बळी जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी यापुढे राज्यात सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे.
दंडाची रक्कम 500 रुपये असताना सीटबेल्ट नियमाचे उल्लंघन करत बरेच वाहनचालक सीट बेल्ट न वापरता वाहने चालवत असल्यामुळे दंडाच्या रकमेत वरील प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
तसेच पोलीस महासंचालकांच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे.या आदेशानुसार बेळगावात देखील याची अंमलबजावणी लवकर होणार आहे.