राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारा जिल्हा म्हणजे बेळगाव जिल्हा होय. मात्र गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या जिल्ह्याने भाजपचे तीन मातब्बर नेते गमावले आहेत. लिंगायत समाजाच्या या तीन नेत्यांच्या निधनामुळे भाजपचे नुकसान झाले आहे.
बेळगावचे खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती आणि सौंदत्तीचे आमदार आनंद मामणी असे पंचमसाली लिंगायत समाजातील भारतीय जनता पक्षाचे तीन मातब्बर नेते गेल्या दोन वर्षात स्वर्गवासी झाले आहेत. यामुळे भाजपला मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
कोरोना काळात 23 सप्टेंबर 2020 रोजी खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव शहर परिसरात वरिष्ठ भाजप नेत्यांची वाणवा निर्माण झाली होती. अंगडी करत असलेली बेळगाव शहरासाठीची विकास कामे खास करून रेल्वेची विकास कामे ठप्प झाली होती.
अंगडी यांच्यानंतर वन आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांचे गेल्या 6 सप्टेंबर 2022 रोजी आकस्मिक निधन झाले. हुक्केरी मतदार संघातून तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून येण्याद्वारे आपली लोकप्रियता सिद्ध करणारे उमेश कत्ती हे उत्तर कर्नाटकाचे बुलंद आवाज होते.
त्यांच्यानंतर आता सौंदत्ती मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांचे रविवारी निधन झाले आहे. लिंगायत समाजातील या तीन प्रभावी नेत्यांच्या निधनामुळे फक्त बेळगाव जिल्ह्याचे नाहीतर संपूर्ण राज्याचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे.