बेळगाव महापालिकेने सुमारे 4.50 कोटी खर्चून शहराच्या उत्तर विभागातील कणबर्गी, बसवन कुडची व अलारवाड येथील तलावांचा विकास करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने त्या कामाचा ठेका देण्यासाठी महापालिकेकडून निविदाही काढण्यात आली आहे.
शहराच्या उत्तर भागातील कणबर्गी येथील तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी 1 कोटी 99 लाख रुपये खर्च होणार असून बसवान कुडची येथील तलावासाठी 1 कोटी 29 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे अलारवाड येथील तलावासाठी 1 कोटी 31 लाख रुपये खर्च करण्यात येतील. कणबर्गी गावाच्या हद्दीत सर्व्हे क्र. 103, 650 व 587 मध्ये तलाव आहे.
त्या तलावाची सुधारणा केली जाणार आहे. कणबर्गी गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तलावाची सुधारणा या आधीच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. त्या तलावात आता वॉटर स्पोर्ट्स सुरू केले जाणार आहेत. कणबर्गी तलावाची सुधारणा झाली असली तरी त्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात नाही. मात्र पुनरुज्जीवनानंतर त्या तलावातील जलस्त्रोतांचे संवर्धन होऊन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची देखील सोय होणार आहे.
बसवण कुडची व अलारवाड या दोन गावातील तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यातील जलस्त्रोतांचे संवर्धन केले जाणार आहे. जिल्हा पंचायतीकडून या आधी तलाव सुधारणा योजना हाती घेण्यात आली होती.
त्यावेळी बेळगाव शहर व तालुक्यातील कांही तलावांची सुधारणा झाली होती. तथापि ते काम योग्य पद्धतीने झाले नव्हते, तलाव सुधारणेच्या कामात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे आता महापालिकेकडून तरी तलाव सुधारण्याचे काम योग्य पद्धतीने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.