Saturday, December 28, 2024

/

पहिल्याच दिवशी ‘ही आहे’ तिसऱ्या उड्डाण पुलाची अवस्था

 belgaum

टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाण पुलाचे काल बुधवारी उद्घाटन करून तो वाहतुकीस खुला करण्यात आला असला तरी आज पहिल्याच दिवशी पुलाच्या अर्धवट विकास कामांचा फटका वाहन चालकांना बसत असून खराब रस्त्यामुळे प्रत्येक जण प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहे.

तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला करण्यात आला असला तरी या पुलाची काही विकास कामे अद्यापही अर्धवट अवस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रामुख्याने पुलाच्या रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे खानापूरकडून बेळगावकडे येणाऱ्या वाहन चालकांना पुलावरून उतरताना आपली वाहने खड्ड्यातून न्यावी लागत आहेत.

या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण अथवा कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी मातीचा भराव आणि खड्डे असलेल्या रस्त्याच्या या ठराविक भागातून वाहने हाकणे मनस्तापाचे ठरत आहे. ट्रक वगैरे यांसारख्या अवजड वाहनांमुळे तर या रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय होत चालली आहे त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास अल्पावधीत रस्त्याचा हा ठराविक भाग धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी उड्डाणपुलाची ही अवस्था झाल्यामुळे नागरिकात विशेषतः वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्याप्रमाणे सदर उड्डाणपुलाची अन्य काही विकास कामे अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत. पुलाची एका बाजूची रंगरंगोटी अर्धवट सोडण्यात आल्यामुळे न रंगवलेला भाग पुलाच्या सौंदर्याला गालबोट लावणारा ठरत आहे. एका ठिकाणी पुलाच्या कठड्यावरील लोखंडी रेलिंग सलग बसवण्यात आलेले नाही.

यासारखी अन्य कांही विकासकामे व्यवस्थित पूर्ण करण्यात आली नसल्यामुळे आत्ताच ही परिस्थिती तर भविष्यात या उड्डाणपुलाची काय अवस्था होणार? याचा विचार न केलेलाच बरा अशी प्रतिक्रिया सध्या वाहन चालकांमध्ये व्यक्त होत आहे.Bridge

दरम्यान नेटिव्ह हॉटेल जवळून शहरात जाणाऱ्यांना काँग्रेस रोडचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र गोवावेस किंवा आरपीडीकडे जाणाऱ्यांसाठी उड्डाणपुलाचा आधार घ्यावा लागणार आहे. आरपीटीकडून उद्यमबाग व परिसरात जाणाऱ्यांना या पुलावरूनच जावे लागणार आहे.

हा उड्डाणपूल फक्त 12 मीटर रुंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहने आल्यास या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उड्डाणपुलामुळे काँग्रेस रोडवरील निम्मी वाहतूक या मार्गावरून वळविले जाणार आहे. परिणामी काँग्रेस रोडचा आभार देखील उड्डाण पुलावर येणार आहे. एकंदर परिस्थिती पाहता या ठिकाणी नियमित वाहतूक पोलीस नियुक्त करावा लागणार आहे.

1 COMMENT

  1. No body will comment on this dirty work . Because Belgaum people are quite,calm and happy only once that is at election
    time. Go bless them for not firing even for such hopless and dirty work display .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.