बेळगाव तालुक्याचा पूर्व भाग हादरवून सोडलेल्या डबल मर्डरचा तिढा सोडवण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे गुरुवारी रात्री झालेल्या डबल मर्डर प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलीस हेड कॉन्स्टेबलना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त रवींद्र गडादी यांनी दिली.
शनिवारी प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले, बेळगाव तालुक्यात गुरुवारी झालेल्या खून प्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुळेभावी येथील शशिकांत भीमाप्पा मिसळले (२४) आलियास ससणा यल्लेश हुंक्री पाटील (२२), मंजुनाथ शिवाजी परोजी (२२), देवप्पा रवी कुकडोळ्ळी (२६), खणगाव बी के या गावातील संतोष यल्लाप्पा हणबरट्टी (२०), भरमाण्णा नागाप्पा नायक (२०) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गडादी यांनी पुढे सांगितले की गावातील दोन गटात झालेल्या वादावादीतून महेश मुरारी, प्रकाश हुंकारी पाटील या दोघांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या खुनात या सहा जणांचा हात असल्याची माहिती मिळाली असून यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी चार आरोपी सुळेभावी या गावातील तर दोन खणगाव या गावातील आहेत. दोन गटात मागील पाच महिन्यांपासून क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली होती. सदर खून पूर्ववैमनस्यातून झाले असून महेश मुरारी या टोळीने धमकी दिली होती.
क्षुल्लक कारणावरून सुरु झालेल्या वादावादीत दोघांचा जीव गेला असून सुळेभावित झालेल्या या खून प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.