ऊस हा जमिनीतून एकाकी उगवतो, त्याला फांद्या फुटत नाही. मात्र उसाला फांद्या फुटण्याचा क्वचित आढळून येणारा निसर्गाचा चमत्कार काकती येथे घडला आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. गजानन पाटील यांच्या काकती येथील घराच्या मागील बाजूस परसदारी लावलेल्या एका ऊसाला चक्क 5 फांद्या फुटल्या आहेत.
लक्ष्मीनगर फर्स्ट क्रॉस, काकती येथील आपल्या घराच्या मागील बाजूस परसदारी मोकळ्या जागेत ॲड. गजानन पाटील यांनी हौसेपोटी ऊस लावला आहे.
दिवाळीच्या लक्ष्मी पूजनासाठी आज मंगळवारी ॲड. पाटील तो ऊस तोडण्यासाठी गेले असता जमिनीतून उगवलेल्या एका ऊसाला वरच्या बाजूला चक्क पाच फांद्या फुटून 5 ऊस आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
एक नवे दोन नव्हे तब्बल 5 फांद्या फुटलेला हा ऊस म्हणजे निसर्गाचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. फांद्या फुटलेला हा दुर्मिळ ऊस सध्या कुतूहलाचा व चर्चेचा विषय झाला आहे.