केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने आत्तापर्यंत 103 विकास कामांवर तब्बल 761.21 कोटी रुपयांचा निधी खर्च केला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ प्रवीण बागेवाडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाला गेल्या 2016साली प्रारंभ झाला. या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत एकूण 930 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्यात आला आहे.
या निधीतील 854 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत मंजूर झाला असून त्यापैकी 761.21 कोटी रुपये विभिन्न 103 विकास कामांवर खर्च करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीची 554.38 कोटी रुपये खर्चाची एकूण 67 कामे पूर्ण करण्यात आली असून 36 कामे प्रगतीपथावर आहेत.
दिव्यांग मुलांसाठी महात्मा फुले उद्यान येथे फिजिओथेरपी केंद्राची उभारणी, रवींद्र कौशिक ई -लायब्ररी, किड्स झोन, संकल्पनेवर आधारित 11 उद्यानांची निर्मिती, कणबर्गी तलावाचे नूतनीकरण, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, हॉस्पिटल्सचा विकास, स्मार्ट रस्ते वगैरे विकास कामे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत करण्यात आली आहेत.
या खेरीज सार्वजनिक खाजगी भागीदारीमध्ये 211.06 कोटी रुपये खर्चाची 6 विभिन्न कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. संयुक्त राष्ट्र आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्सतर्फे आयोजित स्मार्ट सोल्युशन्स चॅलेंज -2022 या व्यापक शहरी स्पर्धेत बेळगाव शहराने अव्वल स्थान मिळवले आहे. मुंबई येथे घेण्यात आलेल्या स्मार्ट अर्बन नेशन -2022 या स्पर्धेतील विविध श्रेणीत बेळगाव स्मार्ट सिटीने 3 पारितोषिके पटकाविले आहेत हे विशेष होय.