लहानपणी आलेल्या अपंगत्वावर मात करून घरातूनच शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि सध्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आपल्या दिवंगत मित्राच्या युवा अपंग मुलाची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत आमदार ॲड. अनिल बेनके यांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवताना त्याला विद्युत व्हील चेअर भेटीदाखल देऊन त्याच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला सलाम केला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आमदार ॲड. अनिल बेनके यांचे एक परममित्र कै. प्रताप अडव हे व्यवसायाने छायाचित्रकार होते. अचानक कांही वर्षामागे त्यांचा देहांत झाला. त्यांचा चिरंजीव पियुष प्रताप आडाव याला लहानपणी शाळेला जात असते वेळी शाळेमध्ये पाठीच्या कण्याला मार बसून अपंगत्व आले. परिणामी चालता येत नसल्यामुळे त्याचे शाळेला जाणे बंद झाले. तथापी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर पियुषने आपले सर्व शिक्षण घरातूनच पूर्ण केले. आता तो कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
पियुषच्या अपंगत्वाची नोंद घेऊन आमदार बेनके आणि प्रताप अडव यांचे मित्र हेमंत शिंदे, दीपक सुळेभावीकर, अभय सावंत, कलघटगी, उमेश सुपली, महेश गोखले, श्रीकांत माने, आनंद मोरे, राजू निलजकर, भाऊ माणसे, जुगल किशोर मोदानी, अनिल चव्हाण, नंदू बांधवडेकर, शिवा काक्तीकर व सुमन मोरे या सर्वांनी मिळून आर्थिक मदत म्हणून पैसे गोळा करून त्याच्यासाठी विशेष विद्युत व्हीलचेअर करून देण्याचा निर्णय घेतला.
याबाबतची माहिती मिळताच आमदार ॲड. अनिल बेनके त्वरित आपल्या स्वर्गीय मित्राच्या घरी जाऊन पियुषची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच त्याची व्हील चेअरची गरज लक्षात घेऊन तात्काळ 48000 रु. किमतीची विद्युत व्हील चेअर महानगरपालिकेतून मंजूर करून पियुषला घरपोच देऊ केली. त्यावेळी आमदारांनी स्वतः पियुषला त्या विद्युत व्हीलचेअरवर बसविले.
व्हील चेअर बसताच पियुषचा आनंदाने फुललेला चेहरा पाहून आमदारांना देखील अत्यानंद झाला. विशेष म्हणजे वरील आपल्या मित्रमंडळींनी आर्थिक सहाय्य म्हणून जो पैसा गोळा केला होता तो पैसा आमदार बेनके यांनी पियुष आडाव याच्याकडे सुपूर्द करून त्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. स्वतःच्या मुलाप्रमाणे आमदार आमदार ॲड. अनिल बेनके यांनी पियुषची गरज लक्षात घेऊन त्याला सहाय्य केल्याबद्दल अडव कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पियुषच्या मदतीसाठी प्रयत्न केलेल्या आपल्या सर्व मित्रमंडळींना धन्यवाद देत पियुष प्रमाणे कोणाला मदतीची गरज असल्यास त्यांनी आपल्याशी त्वरित संपर्क साधून भेटावे असे आवाहन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.