संपूर्ण बेळगाव शहराला हादरून सोडलेल्या शिवाजीनगर येथील दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले असून या प्रकरणी तिघा जणांना गजाआड करण्यात आले आहे.
बेळगाव तालुक्यातील खनगाव येथील लक्ष्मण यल्लाप्पा होसमनी या 19 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. प्रज्वल करीगार या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे.
लक्ष्मणसह आणखी दोघां अल्पवयीन मुलांना कॅम्प पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रज्वल करेगार याचा मुचंडी येथील शेतवाडीत डोकं दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
खुनाची ही घटना 20 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. तत्पूर्वी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजता खून झालेल्या विद्यार्थ्याचे वडील शिवानंद करेगार यांनी जी. ए. हायस्कूलमधून प्रज्वलचे अपहरण झाल्याची असल्याची किंवा तो हरवला असल्याची फिर्याद नोंदवली होती.
त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी दुपारी पुन्हा एकदा फिर्यादीनी तक्रार देत आपल्या मुलाचा अपहरण करून घेऊन मुचंडी शेतवाडीत दगडाने डोक्यावर ठेचून खून केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कॅम्प पोलिसांनी या खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने चौफेर जाळे पसरवून अखेर या खून प्रकरणाचा छडा लावला. खनगाव येथील लक्ष्मण होसमनी आणि कन्या दोन अल्पवयीन मुलांनी क्षुल्लक कारणावरून वैयक्तिक द्वेषापोटी प्रज्वल याचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.