बेळगाव महानगरपालिकेसमोर अनधिकृतरित्या लावलेल्या ध्वजस्तंभावरील लाल पिवळा झेंडा बदलण्याचा कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा डाव पोलिसांनी हाणून पाडल्याची घटना काल गुरुवारी घडली. त्यामुळे महापालिका आवारात कांही काळ तणाव निर्माण झाला होता.
बेळगाव महापालिकेसमोर गेल्या डिसेंबर 2020 मध्ये श्रीनिवास ताळूकर हा कन्नड म्होरक्या व त्याच्या सहकाऱ्यांनी अनाधिकृत ध्वजस्तंभ उभारून त्यावर लाल पिवळा ध्वज फडकविला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली समस्त मराठी भाषिकांनी या कृतीला विरोध करून तो ध्वजस्तंभ व झेंडा हटवावा अशी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने तो हटवलेला नाही.
गतवर्षी ताळूकर याने कर्नाटक राज्योत्सवाच्या आधी झेंडा बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही पोलिसांनी त्याला रोखले होते. तथापि महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मदतीने रात्री झेंडा बदलण्यात आला होता. त्याला मराठी भाषिकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी रात्री झेंडा बदलण्याच्या प्रकारावर टीकाही झाली होती.
यंदाही येत्या 1 नोव्हेंबर राज्योत्सवाच्या आधी संबंधित झेंडा बदलण्याचा संबंधित कन्नड संघटनेचा डाव होता. मात्र त्याची कुणकुण पोलिसांना लागताच गुरुवारी सकाळपासून मार्केट पोलीस ठाण्याचे पथक महापालिका कार्यालयासमोर तैनात होते.
ताळूकर व त्यांचे सहकारी झेंडा बदलण्यासाठी गेले त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस व कन्नड कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्यामुळे अल्प काळ तणाव निर्माण झाला होता.