नियोजित बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठीच्या भू-संपादन प्रक्रियेला गती देण्याची सूचना बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज सोमवारी आयोजित विकास कामांच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केली.
बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी जमिनीचे संपादन करण्यासंदर्भात यापूर्वीच 11(1) नोटीस बजावण्यात आली असल्यामुळे भू-संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात यावी, अशी सूचना मंत्र्यांनी उपस्थित डीडीएलआर, केआयडीबी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. ऊस पिकाच्या कापणीनंतर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाशी संबंधित मार्किंग आणि इतर प्रक्रिया हाती घेतल्या जाव्यात. या कामात रेल्वे खात्याच्या सर्व्हेयरना देखील सामील करून घेण्यात यावे, असेही त्यांनी सुचविले. त्यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सध्या सदर रेल्वे मार्गासाठी बेळगाव ते कित्तूर दरम्यान भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती दिली. आढावा बैठकीस विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.