मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याच्या विशेष मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरवली असून या प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. या मोहिमेत महानगरपालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून दोन दिवसांच्या मोहिमेत केवळ ९ हजार मतदारांचेच आधार लिंक झाले आहेत. आधार संकलित केलेली माहिती संगणकावर अपलोड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात हे काम सुरु आहे.
या विशेष मोहिमेसाठी १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ व ९ ऑक्टोबरत रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील आधार लिंकचे काम ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले असून दोन्ही मतदार संघातील १ लाख ९० हजार मतदारांचे आधार मतदार क्रमांकाशी लिंक करण्यात आले आहेत. दोन्ही मतदार संघात एकूण ४ लाख ७० हजार मतदार असून अद्याप २ लाख ८० हजार मतदारांचे आधार लिंक होणे बाकी आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आधार लिंक मोहिमेला जसा प्रतिसाद मिळत आहे त्याप्रमाणे शहरी भागात प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झाली आहे. दोन महिने उलटूनही आधार लिंकींगचे काम ४० टक्के इतकेच झाले असून विशेष मोहीम राबवून देखील मतदारांमध्ये उदासीनता दिसून येत असल्याने मनपा प्रशासन हतबल झाल्याचे निदर्शनास येत आहे. उर्वरित काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न पालिका निवडणूक विभागासमोर उभा आहे.
आधार लिंक करण्यासाठी मनपाकडून या महिन्यात दोनवेळा विशेष मोहीम राबविण्यात आली. गांधी जयंतीच्या निमित्ताने २ आणि ३ ऑक्टोबर रोजी हि मोहीम सुरु ठेवण्यात आली होती. मात्र यादिवशी केवळ १० हजार मतदारांचेच आधार क्रमांक लिंक झाले आहेत. त्यानंतर ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी सरकारी सुट्टीच्या दिवशीही हि मोहीम राबविण्यात आली मात्र यावेळीदेखील केवळ ९००० जणांचीच आधार नोंदणी झाली आहे. प्रत्येक प्रभागाची स्वतंत्र ५८ पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पथकांच्या मदतीसाठी महसूल कर्मचाऱ्यांचीहि नियुक्ती करण्यात आली होती. पथकातील सदस्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आधार क्रमांक आणि मतदार ओळखपत्र घेऊन लिंक करणे असे या मोहिमेचे स्वरूप होते मात्र घरोघरी जाऊनही मतदारांनी प्रतिसाद न दिल्याची तक्रार पालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे.