बेळगाव शहरातील बेम्को क्रॉस ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या दुपदरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचे नांव देण्याची तयारी सुरू झाली आहे. तथापी उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या या रस्त्याला बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणार्यांपैकी एक असलेले स्थानिक दिग्गज उद्योजक बेम्को कंपनीचे संस्थापक दिवंगत बाबुराव पुसाळकर यांचे नांव देणे अधिक समर्पक व उचित ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
बेम्को क्रॉस ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या दुपदरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचे नांव देण्याचा प्रस्ताव बेळगाव महापालिकेने तयार केला आहे. यासंदर्भात सूचना आक्षेप आणि तक्रारी मांडण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. बेम्को क्रॉस ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतचा रस्ता हा बेळगावला खानापूर आणि गोव्याशी जोडणारा पूर्वापार जुना रस्ता आहे. एकेकाळी जेंव्हा बेळगावला शेती आणि व्यापारा व्यतिरिक्त इतर काही माहीत नव्हते त्या काळात या रस्त्याशेजारी बेम्को हायड्रोलिक्स कंपनीची स्थापना करून कै. बाबुराव पुसाळकर यांनी औद्योगिक क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली.
त्यानंतर कालांतराने बेम्कोच्या हायड्रोलिक प्रेसने फक्त देशाला नव्हे तर जगाला बेळगावची ओळख करून दिली. हे करत असतानाच पुसाळकर यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून बेळगाव शहरातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याद्वारे त्यांच्या उदरनिर्वाहास सहाय्य केले. त्याकाळी फॅक्टरी, कंपन्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये चालत होते. तेंव्हा पाळी संपली की सायकल वरून घरी परतणाऱ्या असंख्य कामगारांचा थवा काँग्रेस रोडवर पहावयास मिळत असेल. बाबुराव पुसाळकर हे कंपनीच्या उत्कर्षाबरोबरच आपल्या कामगारांची देखील तितकीच काळजी घेत. त्यामुळे हयात असलेले जुन्या काळातील बेम्कोचे कर्मचारी आज देखील पुसावळकर यांचे नाव मोठ्या आदराने घेत असताना दिसतात. ही वस्तुस्थिती असल्यामुळे बेम्को कंपनीपासून तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याला कै. बाबुराव पुसाळकर यांचे नांव देणे योग्य ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सदर रस्ता हा औद्योगिक वसाहतीतून जात असल्यामुळे कै. बाबुराव पुसाळकर यांच्यासारख्या दिग्गज उद्योजकाचे नांव देणे ऐवजी त्या रस्त्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव देण्याची तयारी सुरू झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
दरम्यान महापालिकेने तयार केलेल्या सदर रस्त्याच्या नव्या नामकरणाच्या प्रस्तावाची उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी विशेष करून मराठी भाषिक उद्योजकांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास 70 टक्के मराठी भाषिक उद्योजक आहेत. त्यापैकी अनेकांनी देश विदेशात बेळगावचा नावलौकिक वाढविला आहे. त्यामुळे हे सर्व उद्योजक बेम्को क्रॉस ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या दुपदरी रस्त्याच्या नामकरणाच्या बाबतीत कोणती भूमिका घेणार? हे पहावे लागेल.