बेळगाव शहरा नजीकच्या पंत बाळेकुंद्री येथे सलग तीन दिवस आयोजित श्री पंत महाराज पुण्यतिथी उत्सवाची आज तिसऱ्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाने सांगता होणार आहे.
बेळगावपासून 15 कि. मी. अंतरावर असलेल्या बाळेकुंद्री (ता. जि बेळगाव) येथे श्री पंत महाराजांचे मंदिर आहे. बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पंत महाराज बाळेकुंद्री उत्सवाला दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यंदा गेल्या मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे.
उत्सवाच्या पहिल्या दोन दिवसात सुमारे 25 हजार भाविकांनी श्रीपंत महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले आहे. शुभारंभाच्या पहिल्या दिवशी समादेवी गल्ली येथील श्री पंत वाड्यातून पंत बाळेकुंद्री येथील मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर काल बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि श्रींचा पालखी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. पालखी सोहळ्यातील भजनासह लेझीम, लाठीकाठी वगैरे मर्दानी खेळांचे सादरीकरण साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
आज गुरुवारी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून श्रीपंत महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून दुपारी 12 वाजल्यापासून महाप्रसादाचे वितरण केले जाईल. त्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होणार आहे.
तसेच सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी आमराई येथील पूजा स्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचेल आणि त्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.