करपा रोग पडू लागल्यामुळे बेळगाव शहरानजीकच्या शहापूर, अनगोळ, वडगाव, येळ्ळूर शिवारातील बासमती व इंद्रायणीसह इतर भात पिकं धोक्यात आली असून पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
बेळगाव शहरासह तालुक्यात अलीकडे कांही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. या पद्धतीने अचानक हवामानात बदल झाल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन सध्या शहर परिसरातील शिवारांमधील भात पीक धोक्यात आले असून या पिकावर करपा रोगाचे संकट कोसळले आहे. हवामानातील बदलामुळे जमिनीत उष्णता निर्माण होऊन त्यापासून उद्भवलेल्या कीटक मुळापासून भात पीक पोखरण्यास करतात, ज्याचे पर्यवसान करपा रोगात होते.
जो अल्पावधीत झपाट्याने भात पिकात पसरतो. सध्या शहापूर, अनगोळ, वडगाव, येळ्ळूर, हालगा शिवारातील बासमती व इंद्रायणीसह इतर भात पिकांमध्ये या करपा रोगाची लागण झाल्याचे पहावयास मिळत असून शेतकरी भयभीत झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात बेळ्ळारी नाल्याच्या पुरामध्ये भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र त्यातूनही जे पीक बचावले होते, ज्यातून शेतकऱ्यांना चांगल्या आर्थिक प्राप्तीची आशा होती. मात्र आता त्या पिकावर देखील निसर्गाने करपा रोगाच्या स्वरूपात वक्रदृष्टी टाकल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
हातातोंडाशी आलेल्या भात पिकाला करपा रोगाची लागण झाल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी वर्ग पदरमोड करून औषध फवारणी करण्याद्वारे करपा रोगाचे संकट दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र सदर रोग सहसा आटोक्यात न येणार असल्यामुळे प्रशासन आणि कृषी खात्याने उपरोक्त शिवारांमध्ये विमान अथवा ड्रोनच्या सहाय्याने शाश्वत करपा रोग प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी जोरदार मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.