ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर परत एकदा रिंग रोडसाठी भूसंपादनाची टांगती तलवार आली आहे. राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे काल यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यात 31 गावांमधील 509.7677 हेक्टर (सुमारे 50,97,677 चौ. मी.) जमीन भूसंपादित करण्याचे नमूद आहे. यामुळे शेतकऱ्यात संतापाची लाट उसळली आहे.
हलगा -मच्छे बायपास आणि त्याला रिंग रोडची जोड देऊन बेळगाव तालुक्यात रिंग रोड निर्मितीची योजना सुरू आहे. मात्र त्याला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे शेतकऱ्यांनी सुपीक जमीन भूसंपादनाला आक्षेप नोंदविला आहे. रिंग रोड करण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. त्या विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन न्यायालयाचा स्थगिती आदेश मिळविला होता. रिंग रोड संदर्भातील दावे उच्च न्यायालयात प्रलंबित असताना सुधारित आणि काही नव्या सर्वे क्रमांकाचा समावेश करत रिंग रोडचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.
सदर प्रस्तावा संदर्भातील अधिसूचना एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच रिंग रोडसाठी जमीन घेण्यात येणार असलेल्या गावांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. रिंग रोड हा रस्ता 69.387 कि. मी. अंतराचा होणार आहे शहराला लागून असलेल्या गावातून हा रस्ता चार ते सहा पदरी करणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन या रस्त्यामध्ये जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून 21 दिवसांच्या आज शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 (48 ऑफ 1956) व अधिकाराचा वापर करून 3 अ अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णवर यांनी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बेळगाव येथील प्रांताधिकारी कार्यालय बेळगाव सदाशिवनगर येथील येथील भूसंपादन विभाग येथे लेखी स्वरूपात तक्रार मांडता येईल. त्यानंतर आक्षेप अर्जांवर सुनावणी होईल. सुनावणीला आक्षेपधारक किंवा विधी अभ्यासक मालमत्ता किंवा शेतकऱ्यांच्यावतीने उपस्थित राहू शकतात. हरकती मिळाल्यानंतर योग्य कार्यवाहीची गरज भासल्यास सुधारणा केली जाईल किंवा आक्षेप अस्वीकृत केला जाईल. याबाबतचे अधिकार विभागाला आहेत, असा उल्लेख अधिसूचनेत आहे.
रिंग रोडसाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या 31 गावांमध्ये बेळगाव, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बिजगर्णी, गोजगा, होनगा, कडोली, काकती, कलखांब, कल्लेहोळ, खमकारट्टी, कोंडसकोप्प, मन्नूर, मास्तमर्डी, मुचंडी, मुतगा, नावे, संतिबस्तवाड, शगमनट्टी, शिंदोळी, सोनट्टी, सुळगा, धम्मनायकनहट्टी (धामणे), तुरमुरी, उचगाव, वाघवडे, येरमाळ, येळ्ळूर व झाडशहापुर या गावांचा समावेश आहे. दरम्यान रिंग रोड मध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत. केवळ राजकीय व्यक्तींना याचा लाभ व्हावा यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यापूर्वी शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. या नवीन नोटिफिकेशनमुळे शेतकऱ्यांना पुन्हा लढा द्यावा लागणार आहे
बेळगांव मध्ये खूप असे शेतकरी आहेत की त्यांची जमीन एक एकर किव्हा त्या पेक्षा कमी आहेत
तरी कृपया या गोरगरीब शेतकरी साठी न्याय मिळावा म्हणून एक आवाज उठवण्याची खूप अत्यंत काळाची गरज आहे