बेळगाव लाईव्ह विशेष : आपल्या कार्यामुळे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपली वेगळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आणि आपल्या कार्याने इतर महिलांना प्रेरित करणाऱ्या अनेक महिला आज आपली प्रतिमा बळकट करत आहेत. गेली ३ वर्षे अशा नवदुर्गेच्या रूपातील महिलांचा सन्मान ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून केला जातो. आजची आपली नवदुर्गा आहे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुरेखा पोटे..
गर्भारपण, बाळंतपण हे स्त्रीच्या आयुष्यातील महत्वपूर्ण असे वळण आहे. या टप्प्यावर महत्वपूर्ण भूमिका बजावणारे प्रसुतिरोग तज्ज्ञ यांचीही यादरम्यान खरी कसरत असते. आई आणि बाळ कसे सुखरूप राहतील याबाबत प्रसूतीतज्ञ देखील अनेकदा अंतर्मुख होतात. अशीच कसरत झेलणाऱ्या डॉ. सुरेखा पोटे. वडिलांच्या नोकरीमुळे भारतातील विविध प्रांतात बालपण आणि शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. पोटे यांनी बालपणीपासूनच डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले. “एकवेळ घरकाम करेन, पण डॉक्टरच बनेन” हि जिद्द मनात ठेवून त्यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडून यातच आपले करियर सुरु ठेवले. गेली ३५ वर्षे प्रसूतीतज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. सुरेखा पोटे यांना वैद्यकीय क्षेत्रात अनेक पेचप्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.
प्रसूती हा जसा एका स्त्रीसाठी परीक्षेचा काळ असतो तसाच तो समाजाच्या आणि कुटुंबियांच्या दृष्टिकोनातूनही परीक्षेचा काळ असतो. नऊ महिने आपल्या गर्भात मूल वाढवणाऱ्या महिलेला काळजी वाटते त्याच्या कैकपटीने समाजाला आणि कुटुंबियांना काळजी लागलेली असते. अलीकडे स्त्रीभ्रूण आणि यासंदर्भात अनेक अडचणी समोर आल्या आहेत. सोनोग्राफीच्या माध्यमातून लिंगतपासणी करणे, लिंगतपासणीत स्त्रीभ्रूण आढळल्यास भ्रूणहत्येचा मार्ग निवडणे.. यावर कायदेशीर बंदी घालण्यात येऊनही आजही अनेक लोक डॉक्टरांवर दबाव निर्माण करताना आढळतात. अशा अनेक प्रसंगातून डॉ. सुरेखा पोटे यांना जावे लागले आहे. खासबाग येथे प्रसूती आणि नर्सिंग होम चालविणाऱ्या डॉ. पोटे यांनी आजपर्यंत अनेक महिलांची प्रसूती विनामूल्य केली आहे. मुलगी झाली तर बाळंतिणीला नजरअंदाज करणे आणि मुलगा झाला तर तिच्या इच्छा पूर्ण करणे अशी मानसिकता असलेल्या आपल्या समाजाकडे दुर्लक्ष करत आपल्या मॅटर्निटी होम मध्ये येणाऱ्या प्रत्येक बाळंतिणीची काळजी डॉ. पोटे स्वतः जातीने घेतात. मुलगा असो किंवा मुलगी कोणत्याही प्रसूतीनंतर सर्वात पहिला चहा हा डॉ. पोटे पुरवतात.
भारतनगर या परिसरात मॅटर्निटी होम चालविताना अनेक गर्भवती महिला या प्रसूतीसंदर्भात जागरूक नसल्याचे आढळून आल्याचे त्या सांगतात. अशिक्षित, आरोग्यासंदर्भात पुरेशी माहिती नसणे अशा पद्धतीची अनेक दांपत्ये अत्यंत बेजबाबदारपणे आपल्या मॅटर्निटी होम मध्ये येऊन गेली आहेत. मात्र अशा दाम्पत्यांना योग्य समुपदेशन, योग्य उपचार आणि मुख्य म्हणजे माफक दरात उपचार पुरविणे हि डॉ. सुरेखा पोटे यांची खासियत आहे. त्यांच्या या खास शैलीमुळे त्या या भागातील रुग्णांचे हक्काचे आणि विश्वासाचे स्थान बनल्या आहेत. तंत्रज्ञान जरी बदलले तरी आजही डॉ. पोटे आणि त्यांच्याकडे विश्वासाने येणारे रुग्ण यांच्यात अतूट असे नाते आहे.
पूर्वी महिला कमावत्या नव्हत्या. मात्र आता महिला बेधडकपणे सर्वत्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत अनेक महिला तणावाखाली असल्याचे आढळून येते. अशा महिलांचे समुपदेशन करणे, त्यांना योग्य उपचार पुरविणे, परिपूर्ण आरोग्यासाठी सर्व घटकांना कशापद्धतीने सांभाळले पाहिजे, शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य कसे जपले पाहिजे यासंदर्भातील विस्तृत माहिती मनमोकळेपणाने त्या रुग्णांशी चर्चा करून देतात. इतकेच नाही तर कोविड काळातही त्यांनी निरंतर सेवा पुरविली असून त्यांच्या माध्यमातून जिव्हाळा फाउंडेशन हि संस्थादेखील कार्यरत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून समाजातील अडलेल्या-नडलेल्या घटकांना मदत पुरविली जाते. विशेष करून महिला, तरुणी आणि मुली यांच्या आरोग्याशी संबंधित सेवा या फाउंडेशनच्या माध्यमातून पुरविली जाते. महिलांच्या आरोग्याशी निगडित अनेक शिबिरांचे त्यांनी आयोजन करून महिलांच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती आणि मार्गदर्शनाचे काम केले आहे. तुकाराम सहकारी बँकेच्या संचालिका आणि उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
कोणत्याही क्षेत्रात मागे नसलेल्या स्त्रियांनी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक जाणून, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर राहावे, आत्मविश्वासाने , न डगमगता, अडचणींवर मात करत आपल्या ध्येयाच्या दिशेने जिद्दीने वाटचाल करावी असा संदेशही त्या आजच्या प्रत्येक स्त्रीला देतात. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या या कार्यासाठी “टीम बेळगाव लाईव्ह’च्या खूप साऱ्या शुभेच्छा!