बेळगावच्या रिंग रोडसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भूसंपादना विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी प्रथम जास्तीत जास्त तक्रारी दाखल होतील यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच 21 दिवसानंतर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या ओरिएंटल स्कूलमधील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनामध्ये आज दुपारी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बेळगावच्या रिंगरोडसाठी अन्यायी भूसंपादनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर शिवाजी सुंठकर, मध्यवर्तीय समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, ॲड. सुधीर चव्हाण, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील वकील श्याम पाटील,एस एल चौगुले आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. सुधीर चव्हाण यांनी नियोजित सुपीक जमिनींच्या भूसंपादनाला कशा पद्धतीने कायदेशीर विरोध करायचा याबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यातील संबंधित सर्व 32 गावातून सुपीक जमिनींच्या भूसंपादनाला विरोध झाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या गावातील शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या रेकॉर्डवर विरोध येणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी 21 दिवसात जास्तीत जास्त तक्रारी नोंदविल्या गेल्या पाहिजेत. यासाठी गावागावात बैठका घेऊन मार्गदर्शन केले जावे. भूसंपादनाला अर्ध्यांचा विरोध, अर्ध्यांचे समर्थन असे झाल्यास सर्वांचा घात होऊ शकतो. तेंव्हा सर्वांनी एकमताने अन्यायी भूसंपादनाला विरोध करण्यासाठी तसा ठराव आज सर्वानुमते संमत करावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह समितीच्या कार्यालयात तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन करून 21 दिवसाच्या आत जास्तीत जास्त तक्रारी नोंदविल्या गेल्या पाहिजेत तसेच झाले तरच पुढचे पाऊल उचलता येईल, असे ॲड. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मनोहर किनेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ॲड. चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे रिंग रोड भूसंपादनाच्या विरोधात येत्या पंधरा-सोळा दिवसात जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात. हरकती नोंदवण्यासाठी दिलेल्या मुदतीत कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक विराट मोर्चा काढावा लागेल. या मोर्चात संबंधित 32 गावातील शेतकऱ्यांसह तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. मोर्चाची तारीख ठरवण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असे सांगून नंतर काही राहून गेले असे वाटता कामा नये यासाठी ड्रोनच्या सहाय्याने भूसंपादित केल्या जाणाऱ्या सुपीक जमिनींचे चित्रीकरण करण्याची कल्पना त्यांनी मांडली. तसेच कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमिनी वाचविण्याच्या निर्धाराने सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहनही किनेकर यांनी केले.
शिवाजी सुंठकर यांनी आपल्या भाषणात कोणताही लढा यशस्वी करायचा असेल तर ते एका दिवसात होत नाही त्यासाठी टप्प्याटप्प्याने जावे लागते. सीमा लढ्याचा पूर्वानुभव असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला ते सर्व टप्पे माहित आहेत. त्यानुसार टप्प्याटप्प्याने पावले उचलत हा लढा यशस्वी करायचा आहे असे सांगून बुडाच्या भूसंपादनाच्या धडक प्रक्रियेची माहिती दिली. शेतकऱ्यांनी हुशार राहताना सर्वप्रथम रिंग रोड भूसंपादनाच्या विरोधात जास्तीत जास्त तक्रारी नोंदवाव्यात. त्याचप्रमाणे एजंटांपासून सावध राहावे. वेळप्रसंगी त्यांना दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडील चाबूक वापरावा, असे सुंठकर म्हणाले.
सरस्वती पाटील यांनी प्रशासन व सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत सध्याच्या प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे असे सांगितले. रिंग रोड करायचाच असेल तर तो सुपीक शेत जमिनीचे नुकसान न करता फ्लाय ओव्हर रिंगरोड देखील होऊ शकतो. शेतकऱ्यांनी आता गप्प बसता कामा नये. तसेच घर, गल्लीपासून दिल्ली होते हे लक्षात घेऊन नेते मंडळींनी भूसंपादना विरोधातील मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे स्पष्ट केले. प्रकाश मरगाळे यांनी देखील जास्तीत जास्त तक्रारी दाखल होणे गरजेचे असल्याचे सांगून सुपीक जमिनीच्या भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघटित लढा महत्त्वाचा आहे. तसेच सरकारने जर पर्याय विचारल्यास फ्लाय ओव्हर रिंग रोडचा प्रस्ताव मांडण्यात यावा असे सांगून मार्गदर्शन केले. बैठकीस समिती कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे सभागृह तुडुंब भरले होते.