बेळगावसह मराठी सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे उद्या 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या कोल्हापूर ते बेळगाव मशाल रॅलीला कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांनी कोगनोळी सीमेवर रोखले. मात्र त्याचा निषेध करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून आसमंत दणाणून सोडला. तसेच दूधगंगेच्या पात्रात उतरून सीमाभागात वाहणाऱ्या या नदीतील पाण्याच्या माध्यमातून सीमाभागाला वंदन केले.
अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आलेला सीमाभाग महाराष्ट्रात विलिन करावा, या मागणीसाठी दि. 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येतो. काळा दिन म्हणून पाळण्यात येणाऱ्या या दिवशी सीमाभागातील समस्त मराठी जनतेला सोबत करण्यासाठी कोल्हापूर येथील शिवसैनिकांनी निपाणी मार्गे बेळगावला मशाल फेरी काढण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिक बेळगावकडे निघाले होते. मात्र, कोगनोळी सीमेवर कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांची अडवणूक आल्यामुळे शिवसेना नेते आणि पोलीस अधिकारी यांच्या जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून आसमंत दणाणून सोडला.
बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, जय भवानी जय शिवाजी अशा घोषण देत शिवसैनिकांनी आम्ही सीमाभागात जाणारच अशी भूमिका घेतली.
मात्र, सीमेवर असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी रोखल्यामुळे कायद्याचा आदर राखत दूधगंगा नदीच्या पात्रात उतरून शिवसैनिकांनी नदीच्या पाण्याला वंदन केले. तसेच आम्ही सीमाभागात जाणाऱ्या नदीला वंदन केले असल्याची घोषणा केली. यावेळी पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पोवार व रवि इंगवले यांनी केले होते. शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती.
शिवसेनेच्या मशाल रॅलीमुळे कोगनोळी सीमेला आज पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी कर्नाटक पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी डीवायएसपी बसवराज यलगार, गोकाक डीवायएसपी मनोजकुमार नाईक, बेळगाव डीवायएसपी वीरेश दोडमनी, निपाणी सीपीआय संगमेश शिवयोगी, सीपीआय बी. एस. तळवार यांच्यासह ग्रामीण उपनिरीक्षक अनिल कुंभार व जवळपास 200 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिस दलाचे करवीर डीवायएसपी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अजितकुमार जाधव, एपीआय दीपक वाचकोरे, पीएसआय रविकांत गच्चे यांच्यासह 50 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तास तैनात होते. याखेरीज जादा पोलीस कुमक बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आली होती.