कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कानडीकारणाचा वरवंटा फिरवत असून दुसरीकडे आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्ष सामान्य मतदारांना विविध आमिषे दाखवित आहेत. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांची एकजूट रहावी, यासाठी येत्या सोमवारपासून जनजागृती करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक काल शुक्रवारी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील हे होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी केले.
बैठकीच्या सुरवातीला तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये तालुक्यातील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार समितीची पुढील ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तसेच जनजागृती मोहिमेचे नियोजन करण्यासाठी खानापूर समितीची व्यापक बैठक उद्या रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कानडीकारणाचा वरवंटा फिरवत असून तालुक्यातील मराठी जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष सामान्य मतदारांना विविध आमिषे दाखवित आहेत. अश्या परिस्थितीत मराठी माणसांनी एकत्र येऊन समिती बळकट करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी येत्या सोमवार दि 10 ऑक्टोबरपासून खानापूर तालुक्यात जनजागृती दौऱ्याचे आयोजन करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
बाळासाहेब शेलार, विलास बेळगावकर, अनंत पाटील, यशवंत बिर्जे, नारायण कापोलकर, मुरलीधर पाटील, डी. एम. गुरव, नारायण लाड आदींनी बैठकीत आपले विचार व्यक्त केले.