Monday, December 30, 2024

/

दुखापतीवर मात करत ‘ती’ ठरली अजिंक्य!

 belgaum

दुखापती वर मात करत बेळगावच्या सृष्टी अरुण पाटील या युवा क्रीडापटूने कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित केएसए लोहपुरुष -2022 या प्रतिष्ठेच्या ट्रायथलाॅन शर्यतीचे विजेतेपद हस्तगत करून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित केएसए लोहपुरुष (आयर्न मॅन) ट्रायथलाॅन शर्यतीमध्ये खुल्या तलावात 1.9 कि. मी. पोहणे, त्यामागोमाग 90 कि. मी. रोड सायकलिंग आणि शेवटी 21.1 कि. मी. रस्त्यावर धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तसेच 10 तासात हे सर्व क्रीडाप्रकार पूर्ण करावयाचे होते.

बेळगावची सृष्टी पाटील हिने 6 तास 11 मिनिटं इतक्या अल्पावधीत ही खडतर शर्यत पूर्ण करून महिलांच्या खुल्या गटाचे विजेतेपद पटकाविले. अलीकडे दहा दिवसांपूर्वी कॉलेज होऊन घरी जाताना अपघाताला सामोरे जावे लागल्याने श्रुती हिच्या उजव्या पायाला बाह्य दुखापत होऊन सूज आली होती. सृष्टीची दुखापत पाहता सर्वसामान्य माणसाला तशा दुखापतीमुळे चालणे अथवा पायावर नीट उभे राहणे देखील कठीण झाले असते. अपघातात जखमी होऊनही श्रुती आपल्या निश्चयापासून ढळली नाही. सदर ट्रायथलाॅन शर्यतीसाठी गेल्या 6 महिन्यापासून खडतर मेहनत घेतली असल्यामुळे पायाच्या दुखापतीसह तिने शर्यतीत भाग घेतला होता. मात्र शर्यत सुरू झाल्यानंतर आपण किती मोठी जोखीम पत्करली हे तिच्या लक्षात आले.

शर्यतीचा पहिल्या प्रकारात भाग घेताना जेंव्हा कोल्हापूरच्या राजाराम तलावात तिने पोहण्यास सुरुवात केली त्यावेळी जखमी पायातून असह्य वेदना सुरू झाल्या. परिणामी सुरुवातीला होण्यासाठी पाय हलवणे ही तिला कठीण जात होते. मात्र सहनशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर तिने निर्धारित वेळेत 1.9 कि. मी. अंतर पोहून पूर्ण केले. दुसरा प्रकार 90 किमी सायकलिंगचा होता. सायकलिंगसाठी जखमी पायामुळे तिला बूट देखील घालता आले नाहीत. त्यामुळे वेदना सहन करत अनवाणी पायाने तिने ताशी 30 कि. मी. वेगाने तिने सायकलिंग प्रकार यशस्वीरित्या पूर्ण केला. अंग मोडून काढणाऱ्या आणि जखमी पायातून असह्य वेदना देणाऱ्या या दोन क्रीडा प्रकारानंतर 21.1 कि. मी. धावण्याचा प्रकार होता. सृष्टीने आपल्या रक्ताळलेल्या पायात कापसाच्या पॅडसह बूट घालून शर्यतीचे धावण्याचे अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले. पाय जखमी असतानाही 6 मिनिटं प्रति कि. मी. या वेगाने ती धावली हे विशेष होय. या पद्धतीने ट्रायथलान शर्यतीचे 70.3 किमी अंतर सृष्टी पाटील हिने 6 तास 11 मिनिटात पूर्ण करून महिलांच्या खुल्या गटाचे विजेतेपद पटकाविले.Srushti patil

सृष्टी ही कडोली (ता. जि. बेळगाव) येथील शेतकरी व उद्योजक अरुण सदाशिव पाटील यांची कन्या आहे. लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी असलेली सृष्टी पाटील आपल्या गावातून जलतरणाच्या सरावासाठी दररोज सायकलवरून बेळगावला ये -जा करते. थोडक्यात रोज सुमारे 40 कि. मी. सायकलिंगचा व्यायाम करणारी सृष्टी बेळगावच्या सुवर्ण जेएनएमसी तलावात 2 तास पोहण्याचा सराव करते.

स्वीमर्स क्लब बेळगावची ती यशस्वी सदस्य आहे. तिला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी अक्षय शेरेगार अजिंक्य मेंडके नितेश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांसह आयर्न मॅन श्रीमती मयुरा शिवलकर डॉ. प्रभाकर कोरे रो. अविनाश पोतदार आणि डॉ. व्ही. ए. कोटीवाले यांचे प्रोत्साहन लाभत आहे उपरोक्त यशाबद्दल सृष्टी पाटील हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.