Saturday, November 16, 2024

/

गोव्याच्या ढोल पथकाची बेळगावात बाजी-‘ताल जल्लोष 2022’

 belgaum

नवरात्र आणि दसरा सणाचे औचित्य साधून बेळगाव उत्तरचे लोकप्रिय आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आयोजित केलेली ‘ताल जल्लोष -2022’ या भव्य ढोल -ताशा स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वांची मने जिंकणाऱ्या गोव्याच्या उसगाव येथील शिवसंस्कृती ढोल पथकाने हस्तगत करताना आकर्षक ट्रॉफीसह एक लाख 11 हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले.

बेळगावात या भव्य प्रमाणात ढोल ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सदर ‘ताल जल्लोष -2022’ या भव्य ढोल -ताशा स्पर्धा सरदार हायस्कूल मैदानावर काल रविवारी रात्री अपूर्व उत्साहात मोठ्या जल्लोषात पार पडली.

या स्पर्धेत गोव्याच्या उसगाव येथील शिवसंस्कृती ढोल पथकाने वेगवेगळ्या प्रकारचे नाद सादर करत सरदार मैदानावरील उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शिवसंस्कृती पथकाचे वादन इतके बेभान उत्कृष्ट होते की त्याने प्रेक्षक आणि परिक्षकानाही आपली खुर्ची सोडून दाद देण्यास भाग पाडले. स्पर्धेला उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवत दाद देत या ढोल पथकाचे कौतुक केलं. ताल, नाद, सूर, ठेका आणि सम यात एकही चूक न करणारे पथक हे लोकांच्या सोबत परीक्षकांच्या पसंदीस उतरले.

ताल जल्लोष -2022 या स्पर्धेचे विजेतेपद पटकवणाऱ्या गोव्याच्या या पथकातील युवती उपासना हिला ‘उत्कृष्ट ढोल वादक’ खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शिवसंस्कृतीच्या सादरीकरणाच्या वेळेत उपासना हिने थिरकत्या पावलावर सतत 18 मिनिटे योग्य ठेक्यासह शिस्तबद्ध आणि उत्साही कौतुकास्पद ढोल वादन केले.

Goa dhol pathak
ताल जल्लोष 2022 विजेते: गोवा येथील शिवसंस्कृती ढोल पथकाचे खेळाडू

ताल जल्लोष -2022 या या ढोल ताशा स्पर्धेत बेळगावातील शहापूर येथील आरंभ ढोल पथकाने दुसऱ्या क्रमांकासह 75 हजार रुपये आणि ट्रॉफी असे बक्षीस मिळविले. बेळगावच्याच शिवगर्जना ढोल पथकाने तिसरा क्रमांक तर मोरया ढोल पथक आणि वज्रनाद ढोल पथक यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. या पथकांना अनुक्रमे 51,000 रुपये 25,000 रुपये 25,000 रुपये आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना देण्यात आलेल्या ट्रॉफी शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या समोरील प्रतिकृतीच्या होत्या हे विशेष होय. उत्कृष्ट ध्वजासाठीचा वैयक्तिक 11 हजार रुपयांचा पुरस्कार वज्रनाद ढोल ताशा पथकाच्या प्रतीक मोरे याला मिळाला तर उत्कृष्ट ताशावादनाचा पुरस्कार अनिरुद्ध शिवगर्जना ढोल पथक आणि
उत्कृष्ट टोल वादनाचा पुरस्कार अनिकेत शटवाजी शिवशंभू ढोल पथक यांना देण्यात आला.

आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या इतक्या भव्य बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत गोव्यासह बेळगाव शहर परिसरातील एकूण 16 ढोल ताशा पथकांचा सहभाग होता. सदर स्पर्धेसाठी खास पुण्याहून परीक्षक मागविण्यात आले होते. या अनुभवी जाणकार परीक्षकांनी स्पर्धेदरम्यान प्रत्येक ढोल ताशा पथकाच्या प्रात्यक्षिकाप्रसंगी जाहीर केलेले विश्लेषणात्मक मत लक्षवेधी ठरत होते. पुण्याच्या या तज्ज्ञ परीक्षकांनी ढोल -ताशा वादनात ताल, नाद, सूर, ठेका आणि सम याबाबतीतील चुका दुरुस्त करून संबंधित पथकांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले. याखेरीस पुण्याहून टोल वादक, ध्वज पथक, ढोल ताशा वादक असे पाच स्पर्धक आले होते त्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके मंत्रमुग्ध करणारी होती.

AArambh dhol pathak
द्वितीय क्रमांकासह आरंभ ढोल पथक

‘ताल जल्लोष -2022’ या ढोल -ताशा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या दिमाखात पार पडला. याप्रसंगी बोलताना स्पर्धेचे आयोजक आमदार ॲड. अनिल बेनके यांनी विजेत्या पथकांचे अभिनंदन करण्याबरोबरच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल उर्वरित सर्व ढोल ताशा पथकांसह बेळगाव शहरवासी यांचे आभार मानले.

त्याचप्रमाणे पुढील वर्षी यापेक्षाही चार पटीने बक्षीस रकमेत वाढ केली जाईल आणि सरदार मैदानावरच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा पुनश्च आयोजित केली जाईल अशी घोषणा केली. उपरोक्त जल्लोषी ढोल ताशा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भगवे वादळ संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.