बेळगाव शहरातील केएलईएस डायबेटिस सेंटर मधील मधुमेहग्रस्त मुलांसाठीच्या मोफत इन्सुलिन सुविधेचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरने ऑस्ट्रेलियाच्या लाइफ फॉर अ चाइल्ड (एलएफएसी) प्रकल्पाच्या सहकार्याने मधुमेहाने ग्रस्त असलेल्या सर्व मुलांसाठी ‘विनामूल्य इन्सुलिन’ सुविधा सुरू केली आहे. डायबिटीज सेंटरमध्ये ही मोफत इन्सुलिन सुविधा टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या सर्व मुलांना मोफत पुरवली जाणार आहे. संपूर्ण उत्तर कर्नाटकात अशा प्रकारचे हे एकमेव केंद्र आहे.
केएलई सोसायटीचे अध्यक्ष आणि केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी गेल्या बुधवारी या सुविधेचे उद्घाटन केले. मागील 22 वर्षापासून मधुमेही मुलांसाठी डॉ. कोरे मधुमेह केंद्राला मदत करत आहेत. आपल्या उद्घाटपर भाषणात ते म्हणाले की, मधुमेह हा प्रत्येक पर्यायी घराघरात आढळून येतो आणि आपला अस्वस्थ आहार आणि बैठी जीवनशैली हे त्याचे कारण आहे . सर्व गरजू मुलांची तपासणी करण्यासाठी मधुमेह केंद्रात यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून तपासणीसाठी सर्व शाळांमध्ये शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी मधुमेहावरील उपचार महाग होत असल्याने गरजू मुलांवर उपचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
देशातील सर्वाधिक कष्टकरी शेतकरी देखील मधुमेहाने ग्रस्त आहे. केएलईएस सोसायटीच्या बेळगावसह चिक्कोडी, गोकाक आणि हुबळी येथील हॉस्पिटलमध्ये 4000 बेड्स आहेत. प्रत्येकाला चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे सांगून डॉ. कोरे यांनी डॉ. एम.व्ही. जाली आणि डॉ. सुजाता जाली यांच्या कार्याचे कौतुक केले.
केएलईएस डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे एमडी आणि सीई डॉ. एम. व्ही. जाली यांनी 22 वर्षांपूर्वी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाने केएलईएस डायबेटिक सेंटर सुरू केले. मधुमेह असलेल्या 45 दिवसांच्या बाळाला इन्सुलिन देऊन त्याची सुरुवात झाली. त्यातून एकही बालक इन्सुलिनपासून वंचित राहू नये म्हणून ‘विनामूल्य इन्सुलिन उपचार’ कार्यक्रम सुरू करण्याची कल्पना सुचल्याचे सांगितली.
बालरोग-मधुमेह तज्ज्ञ प्रा. डॉ. सुजाता जाली यांनी आपल्या भाषणात केएलईएस मधुमेह केंद्राने केलेले कौतुकास्पद काम लक्षात घेऊन, एलएफएसी या ऑस्ट्रेलियन संस्थेने इन्सुलिनचे मोफत वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वीच जवळपास 460 हून अधिक मुले या सुविधेचे लाभार्थी बनली आहेत. या महागड्या इन्सुलिनपासून वंचित राहिलेल्या इतर् सर्व मुलांना ते मिळावे हा सदर इन्सुलिन मोफत देण्यामागचा उद्देश आहे. येथे उपचार घेतलेल्या मुलांपैकी 75 टक्के ग्रामीण आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील आहेत. युरोपियन युनियनच्या स्वीट प्रोजेक्टच्या पीअर रिव्ह्यूनुसार केएलईएस डायबेटिस सेंटर हे 59 देशांमधील उत्कृष्ट आरोग्य सेवा केंद्रांपैकी एक आहे.
कोविड-19 महामारीच्या काळात या केंद्राने गरजू मुलांना त्यांच्या दारापर्यंत इन्सुलिन पोहोचवण्याचे कार्य केल्याची माहिती डॉ सुजाता यांनी दिली. एक अमेरिकन संस्था 20 लाख रुपयांची (32000 डॉलर्स) देणगी देण्यासाठी पुढे आली आहे. एलएफएसीद्वारे मोफत इन्सुलिनसाठी मिळालेल्या 36 लाख रुपयांच्या (45,000 डॉलर्स) सध्याच्या देणगीमधून मुलाना मोफत पौष्टिक आहार देण्याची योजना आखण्यात आली आहे असे सांगून संस्थेचे अध्यक्ष आणि कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल डॉ. सुजाता जाली यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
केएलईएस नविन हॉस्पिटल प्रोजेक्ट्सचे संचालक, प्राध्यापक डॉ. व्ही. डी. पाटील यांनीही यावेळी समयोचीत विचार व्यक्त केले. यावेळी प्रा.तन्मय मेटगुड व डॉ.संतोष पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. प्राची नलावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बालरोग मधुमेह क्लिनिकल असिस्टंट डॉ. ज्योती वसेदरा यांनी आभार मानले. कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील निमंत्रित मंडळींसह लाभार्थी मुले, त्यांचे पालक व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.