ओला कचरा तसेच शिल्लक अन्नपदार्थ यांच्या सहाय्याने बायोगॅस तयार करणारा बेळगाव महापालिकेचा शहरातील पहिला बायोगॅस प्रकल्प अझमनगर येथे कार्यान्वित झाला आहे.
अझमनगर येथील इंदिरा कॅन्टीनच्या आवारात 33 लाख रुपये खर्चून हा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला असून या ठिकाणी दररोज कमाल दोन सिलेंडर इतका गॅस तयार होत आहे. सदर बायोगॅस प्रकल्पाची काल बुधवारी यशस्वी चांचणी घेण्यात आली. सदर प्रकल्पातून तयार होणाऱ्या गॅसपासून अझमनगर इंदिरा कॅन्टीन मधील स्वयंपाक तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
बेळगाव महापालिकेकडून अझमनगर येथील बायोगॅस प्रकल्पाच्या क्षमतेचे अन्य दोन प्रकल्प येत्या महिन्याभरात तयार केले जाणार आहेत. खासबाग येथील परमनंट नाईट शेल्टर तसेच उद्यमबाग येथे हे प्रकल्प उभारले जात आहेत. याखेरीज एपीएमसी येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प ही उभारला जात आहे.
या प्रकल्पाचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. एपीएमसी येथील 5 टन क्षमतेच्या या प्रकल्पावर 1 कोटी 28 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
दरम्यान शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याची सूचना महापालिकेने यापूर्वीच दिली आहे.