सततच्या पावसामुळे दिवाळी संपली तरीही अजून शेतात पेरणी झालेली नाही. शेतात हिरवीगार पालवी सुद्धा फुटली नाही. परिणामी कणस, गहू, चणे घेण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अगदीच धुळीस मिळाले आहे. त्यामुळे दुर्दैवाने शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी म्हणजे एक स्वप्नच ठरले आहे.
दिवाळीच्या आधी पाऊस पडताच शेतकऱ्यांना शेतात हजेरी लावावी लागली. त्यांनी मका, गहू, भुईमूग पिकाचे स्वप्न घेऊन पेरणीसुद्धा केली. मात्र वरूणराजाची कहर कांही थांबला नाही.
त्यामुळे कित्तूर आणि कर्नाटकातील कांही जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कि दिवाळी हा प्रकाशाचा सण फक्त शहरी भागातील धनदांडग्यांपुरताच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना विचाराल तर त्यांच्यासाठी दिवाळी हा सण फक्त स्वप्नच होते.
बेळगावसह धारवाड, विजापूर, बागलकोट आदी ठिकाणचे शेतकरी तर डोक्यावर हात लावून बसले आहेत. सततच्या पावसामुळे शेतात पायी चालणे कठीण आहे. ट्रॅक्टरही चालवता येत नाही.
मुसळधार पावसानंतर शेतकऱ्यांची अपेक्षा होती की, शेत सुकेल आणि पेरणी सुरू करता येईल. तथापि यापैकी काहीही न घडता सततच्या पावसामुळे शेतात पाणी मात्र तुंबले आहे.
मका, गहू, भुईमूग या पिकांची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करता येणाऱ्या आशेने शेतकरी राजा खुश होता. पुढील महिन्याच्या सुरुवातीला तीन महिन्याची पिके येतील व आपल्याला शहरात जाऊन थोडे पैसे घेऊन थोडी खरेदी करता येईल अशी बळीराजाची अपेक्षा होती. तथापी वरुणाच्या वक्रदृष्टीमुळे सगळ्या त्याच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या. मका, गहू आणि भुईमूग ही पिके उगवताच ती बाजारात विक्रीसाठी नेऊन ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचे शेतकऱ्यांनी मनाशी ठरविले होते.
मात्र यावेळी पेरणी न करताच पिके कुठून आणावयाची असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे येत्या कांही महिन्यात मका, गहू आणि भुईमूग या पिकांचा निश्चितच तुटवडा जाणवणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे, शिवाय त्यांचे भाव सुद्धा निश्चितच गगनाला भिडणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिव्यांचा सण दिवाळी हा प्रकाशाने उजळून टाकणारा आनंदाचा सण असला तरी यंदाच्या दिवाळीतही शेतकऱ्यांच्या घरात दिव्यांची रोषणाई झालेली नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यासारखे झाले आहे.
कांही ठिकाणी निम्म्याहून अधिक पीक वाया गेल्यामुळे शेतकरी भयंकर अशा संकटात सापडले आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला सरकारने तात्काळ मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.