बेळगाव शहरातील महापालिकेच्या नव्या तलावाची स्वच्छता करण्यात आली असून उद्या विजयादशमीनंतर होणाऱ्या श्री दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी हा तलाव सज्ज ठेवण्यात आला आहे.
सालाबाद प्रमाणे यंदा देखील नवरात्र उत्सवानिमित्त बेळगाव शहरात ठीकठिकाणी श्री दुर्गामाता देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शहरात जवळपास 50 ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली जात आहे.
आता नवरात्रोत्सव समाप्तीनंतर या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने नवीन विसर्जन तलावाच्या ठिकाणी श्री दुर्गादेवी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे. यासाठी सदर तलावाची साफसफाई करून तो मूर्ती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, फक्त तलाव स्वच्छ करून उपयोग नाही तर त्या ठिकाणी विद्युत दिव्यांची सोय केली जावी. तसेच मूर्ती विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी चांगल्या प्रशिक्षित जलतरणपटूंची तलावाच्या ठिकाणी नियुक्ती केली जावी. एकंदर दरवर्षी पेक्षा यंदा प्रतिष्ठापना केलेल्या श्री दुर्गादेवी मूर्तींची संख्या वाढली असल्यामुळे तलावाच्या ठिकाणी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
मागील वर्षी एका उत्तर भारतीय कामगाराचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन महापालिकेने अलीकडे श्री गणेश विसर्जना प्रसंगी ज्या पद्धतीने सुयोग्य नियोजन केले होते तसे नियोजन श्री दुर्गा देवी मूर्ती विसर्जनाप्रसंगी केले जावे, अशी जोरदार मागणी भाविकांकडून केली जात आहे