डीजेला फाटा देत बेळगावकरांनी ढोल ताशा परंपरेला आपलंस केलं आहे. हल्ली प्रत्येक सार्वजनिक उत्सवात डीजे वगळून पारंपरिक ढोल ताशा वादन केले जात आहे. प्रत्येक गल्लोगल्ली ढोल ताशा पथके वाढली असून या ढोल ताशा पथकातील वादकांना प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळवून देण्यासाठी आमदार अनिल बेनके पुरस्कृत ढोल ताशा वादन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
केवळ महाराष्ट्रच नाही तर बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात विविध ठिकाणी या ढोल ताशा पथकांना मागणी असून आता परदेशातही ढोल ताशा पथकांचा आवाज घुमत आहे. अनेकवेळा उत्सवात गर्दीमुळे ढोल ताशा पथकांचे सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही.
आणि अनेकवेळा ढोलताशा पथकांना म्हणावे तसे सादरीकरण करणेही शक्य होत नाही. यामुळे बेळगावकरांसाठी आणि ढोल ताशा पथकांना प्रेरणा देण्यासाठी ढोल ताशा स्पर्धेचे आयोजन आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या स्पर्धेत १६ हुन अधिक पथके या स्पर्धेत वादन करणार असून बेळगावकरांना एका ठिकाणी बसून ढोल ताशा वादन अनुभवण्याची संधी मिळणार आहे. दि. ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे आयोजन बेळगावमधील सरदार मैदानावर करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या पथकांसाठी पहिले पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय ५१ हजार रुपये तर उत्तेजनार्थ २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. याचप्रमाणे उत्कृष्ट ढोलवादक, ताशावादाक, ध्वजधारी, टोलवादक यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.