ग्रामपंचायतीतील सर्व परिपत्रके, सरकारी कागदपत्रके मराठी भाषेत द्यावीत, अशी मागणी हलगा येथील महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्यावतीने करण्यात आली आहे.
हलगा (ता. जि. बेळगाव) येथील महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्यावतीने आज सोमवारी उपरोक्त मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सेक्रेटरी जोसेफ फर्नांडिस यांना सादर करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी भाषिक 21 टक्क्याहून जास्त आहेत.
आमच्या हलगा गावांमध्ये तर 70 टक्क्यांपेक्षा जास्त मराठी भाषिक आहेत. तेंव्हा भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यात कानडी भाषेबरोबर 15 टक्के पेक्षा इतर भाषिक असतील तर त्यांना त्यांच्या भाषेत सर्व सरकारी परिपत्रके व कागदपत्रके देणे कायद्याने बंधनकारक असल्यामुळे आम्हाला हलगा ग्रामपंचायतने सरकारी कागदपत्र व परिपत्रके मराठी भाषेत द्यावीत अशी आमची मागणी आहे, असे मनोहर संताजी यांनी यावेळी सांगितले.
आमची मागणी पूर्ण केली जावी अन्यथा ग्रामपंचायत क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचा सारा न भरण्याद्वारे आंदोलन छेडले जाईल येईल, याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी असा इशारा देण्यात आला.
ग्रामपंचायत सेक्रेटरी ना निवेदन सादर करतेवेळी मनोहर संताजी, देवेंद्र बाळेकुंद्री, फकीरा संताजी, जोतिबा मोरे, पिराजी हनमंताचे, माणिक कामांनाचे, राजू कामानाचे, कुमार जाधव, मनोज बाळेकुंद्री, दर्शन लोहार, पिराजी संताजी, मनोहर बिळगोजी, फकीरा वासोजी, संभाजी संताजी, ज्योतिबा कानोजी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.