उद्याच्या 1 नोव्हेंबर काळा दिन आणि राज्योत्सव दिन याच्या पार्श्वभूमीवर कांही संबंध नसताना रस्त्यावरील दिवाळीच्या शुभेच्छांचे मराठी फलक काढण्यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा प्रकार सध्या बाची येथे सुरू आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर समिती नेत्यांकडून तालुक्याच्या पश्चिम भागातील उचगाव बाची वगैरे गावांमध्ये जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक होर्डिंग लावण्यात आले आहेत.
बाची येथे देखील गावात आणि मुख्य हमरस्त्याशेजारी हे फलक आहेत. म. ए. समितीचे नेते मनोहर किनेकर, शिवाजी सुंठकर व आर. एम. चौगुले यांचे फोटो असलेल्या या फलकांवर समाजात तेढ निर्माण होईल असा कोणताही मजकूर नाही. निव्वळ दिवाळीच्या शुभेच्छा देणारा मजकूर या फलकांवर आहे.
ही वस्तुस्थिती असताना सध्या कर्नाटक पोलिसांकडून सदर फलक काढून टाकण्यात यावेत यासाठी बाची येथील समिती कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्रास दिला जात आहे. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये पोलिसांच्या कृतीचा निषेध केला जात आहे.
बाची हे गाव चंदगड तालुक्यानजीकचे महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील हमरस्त्यावरचे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. आता उद्याच्या 1 नोव्हेंबर काळा दिन आणि राज्योत्सव दिन आहे. यात भर म्हणून महाराष्ट्रातील शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगावसह सीमाभागात आचरणात आणल्या जाणाऱ्या काळा दिनाला पाठिंबा दर्शविला आहे.
यामुळेच कर्नाटक पोलिसांच्या डोळ्यात हे मराठीतील दिवाळीचे शुभेच्छा फलक खूपत असल्याचा आरोप केला जात आहे.