बेळगाव लाईव्ह विशेष /कृषी संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे प्रतीक असणारे दारात घालणाऱ्या पांडव व गवळण, महिला वर्गाकडून दिवाळीच्या पाचव्या दिवशी पांडव व गोकुळ यांच्या माध्यमातून कला संस्कृती सादर केली जाते. महाराष्ट्रात व कर्नाटकाच्या काही भागात ही संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाते.
महिलावर्ग शेणाचा वापर करून पाच पांडव, गवळणी गवळणीची मुलं,चूल,जातं, भाकरी करणाऱ्या बायकां असं सगळं ग्रामीण जीवन तिथे उभा करतात. केवळ शेणाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी तयार केल्या जातात
धनत्रयोदशीच्या दिवशी पहिली गवळण तयार केली जाते,आणि पाचव्या दिवशी पाडव्या दिवशी संपूर्ण गोकुळ तयार केलं जातं. ह्यात गोकुळ तयार करताना शेणापासून केलेल्या गवळणींना फुलं व कुर्डूच्या तुऱ्यांनी सजवले जाते,आकर्षक रांगोळी काढली जाते,हे गोकुळ तयार करताना अंगणाच्या एका कोपऱ्यात किंवा मध्यभागी संपूर्ण गोकुळ तयार करून ते गोकुळ तसेच ठेवले जाते नंतर ते गोकुळ उचलून छतावर वाळवत ठेवलं जाते आणि कार्तिक पौर्णिमेला ते गोकुळ पेटवल्या जाते.
या गवळणींची संस्कृती अनेक विभागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते,काही ठिकाणी मोठा डोंगर केला जातो.काही ठिकाणी बळीराजाची मोठी प्रतिमा केली जाते,काही ठिकाणी रावण केला जातो. पुराणातल्या कथाना अनुसरून अनेक गोष्टी केल्या जातात. बेळगाव भागात प्रामुख्याने ह्या गवळणी एकत्र करून त्यांचा एक डोंगर तयार केला जातो आणि तो शिवाचा डोंगर असा मानला जातो.
तर बेळगाव मधल्याच काही भागांमध्ये सकाळचे सत्रामध्ये लहान लहान गवळणी प्रत्येक घराच्या उंबऱ्यावर दोन दोन ठेवल्या जातात मग सायंकाळी या लहान लहान गवळणी मिळून संध्याकाळी एकच मोठी गवळण केली जाते आणि त्या ठिकाणी पाडव्यानिमित्त पूजा आरती वगैरे केली जाते. अशी ही परंपरा काही भागात प्रचलित आहे
दिवाळी हा प्रामुख्याने बहरात आलेलं पीक रानात असतानाचा. सण आहे सृजनतेचा सण आहे. एकंदर शेतकरी पीक चांगलं आल्यामुळे आल्यामुळे खूष असतो, बायका मुलं आनंदी असतात.आणि ह्याचच प्रतीक म्हणून या अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी ह्या दिवाळीच्या माध्यमातून केल्या जातात.प्रामुख्याने एक गोष्ट यात लक्षात येते की ज्या कृषी संस्कृतीचं हे प्रतीक आहे त्यात महिला वर्गांना विशेष आपली कला सादर करण्यासाठी वाव मिळतो.
ज्याला गोकुळ असं म्हटलं जातं त्या गोकुळामध्ये कृष्ण, पेंद्या,गवळणी, राधा ह्या सगळ्यांची प्रतिक म्हणजे सगळं उभं केलं जाते. कृष्णाकाळातलं गोकुळाचं चित्र उभा केलं जातं आणि त्यात पांडवही मिसळले जातात,आमची संस्कृती चार वेद व दोन महाकाव्ये आणि पुराणात मांडलेली आहे. ती एकमेकात कथेद्वारे मिसळली आहे.
आमच्या ग्रामजीवनात ही संस्कृती महिला वर्गाने एकत्र मिसळण्याचे काम केले आहे.सगळ्या कथा एकमेकाला जोडलेल्या असतात. कथाकल्पतरु नावाचा पाच खंडाचा जो पुस्तकाचा संच आहे त्यात तुम्ही बघाल की आपले महाकाव्ये, पुराण आणि वेद हे सगळे एकमेकांशी कसं सलग्न आहे आणि ही संलग्नता या कृषी संस्कृतीच्या माध्यमातून महिलांनी आपल्यासमोर मांडलेली आहे.
ही कला हळूहळू लोक पावत आहे, कारण आता गाई म्हशी शहरी भागात कमी झालेल्या आहेत.ग्रामीण भागात मात्र ही संस्कृती टिकून आहे. आपल्या संस्कृतीची ओळख जपण्यासाठी ही संस्कृती टिकली पाहिजे,जपली गेली पाहिजे.