दिवाळीचा मोसम जवळ आला. आणि बाल मंडळी किल्ला बनवण्याकडे वळली आहेत. सध्या सर्वत्र किल्ला बनवण्याची क्रेझ दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी सर्वत्र गड कोट उभारले, मावळे आणि किल्ले हेच त्यांच्या स्वराज्य संस्थापनेसाठीचे महत्वाचे घटक होते. याच किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून त्या जाज्वल्य इतिहासचे स्मरण केले जाते. यामुळेच दिवाळीत किल्ला तयार करण्याची पद्धत रूढ झाली आहे.
मावळे, शिपाई, शिवकालीन वस्तूंच्या प्रतिकृती आणि कल्पकता यांच्या जोरावर ही किल्ले निर्मिती जोरदार सुरू झाली आहे.
सध्या बालपिढी या कामात गुंग आहे. मातीचा चिखल करून त्यात आपली कल्पना रंगवली जाते. यातून स्वतःच्या मनाने काही करण्याची भावना तयार होते.
जरा मुले मोठी झाली की शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती हुबेहूब तयार करण्याचा प्रयत्न करतात. या कलेतून इतिहास तर कळतोच तसेच विविध संस्थांच्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहनही मिळून जाते.
बेळगावमध्ये शहर आणि तालुका मर्यादित अनेक संस्था या किल्ल्यांच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करतात. परंतु केवळ या स्पर्धेत सहभाग दर्शविण्यासाठी नाही तर अत्यंत हिरीरीने आणि उत्साहाने हे किल्ले साकारताना बालचमू दिसतात. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संपूर्ण शहर परिसरात झगमगाट होईल.
यासोबतच बालचमूंनी केलेल्या या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहण्याचीही पर्वणी आपल्याला मिळणार, हे विशेष! साडेतीन शतकांहून अधिक काळ लोटला तरीही छत्रपतींविषयी असलेला आदर आणि उत्साह पाहून अंगावर शहारे आले नाही तरच नवल!