टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ आज बेळगाव दक्षिण काँग्रेसच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनाप्रसंगी टोपलीत पैशाच्या नोटा टाकून 40 टक्के कमिशनचा प्रतिकात्मक निषेध करण्याचा प्रकार साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
तिसरे रेल्वे गेट येथील नव्या उड्डाणपूलाच्या निकृष्ट बांधकामाची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी बेळगाव दक्षिण काँग्रेसच्या वतीने आज बुधवारी सकाळी सदर ब्रिजवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात आले यावेळी मोर्चात सहभागी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या पैसे टाकलेल्या प्लास्टिकच्या बुट्ट्या हातात धरून भाजप सरकारचा निषेध करत होत्या.
राज्यातील भाजप नेते कंत्राटदारांकडून 40 टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप आहे. हा मुद्दा प्लास्टिकची टोपली आणि त्यातील पैशांद्वारे अधोरेखित करण्याचा हा आगळा प्रकार साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
यासंदर्भात बोलताना काँग्रेसच्या नेत्या आयेशा सनदी यांनी सदर ब्रिजच्या उभारणी भ्रष्टाचार करून जो पैसा हडप करण्यात आला आहे. तो पैसा संबंधितांनी बाहेर काढून हा ब्रिज व्यवस्थित सुरक्षित मजबूत करावा. त्यासाठीच सूचक म्हणून आम्ही टोपलीतील पैसे दाखवत आहोत, असे बेळगाव लाईव्हसमोर स्पष्ट केले.
आम्ही रस्ते बांधले म्हणून राहुल गांधी आज पदयात्रा काढू शकत आहेत असे म्हंटले जात आहे. मात्र मी भाजपला सांगू इच्छिते की काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी नुसते पाऊल ठेवले तर तुमचा हा ब्रिज डळमळू लागला आहे. तुम्ही गरिबांना लुटत आहात. त्यामुळे त्यांचा शाप तुम्हाला नक्की लागणार. भाजपने जनतेला कधीही अच्छे दिन दाखवलेच नाहीत.
देशातील गरीब भुकेने मरत असताना भाजप नेते देश विदेशात फिरत आहेत अशी टीका करून तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलाच्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच हा रस्ता जनतेसाठी मजबूत सुरक्षित राहील अशी कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही अधिक उग्र आंदोलन आम्ही भविष्यात छेडू, असा इशाराही आयेशा सनदी यांनी दिला.