बेळगाव शहरातील सिटी सर्व्हे ऑफिसमधील बेळगाव दक्षिणसाठी नियुक्त कामचुकार कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे जनतेला मनस्ताप देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची तात्काळ उचल बांगडी करून त्यांच्या जागी प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सादर केलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्याचे बेळगाव सिटी सर्व्हे ऑफिस पात्रता निकषात न बसणारे आहे. या ऑफिसमध्ये सर्व थरातील आणि वयोगटातील नागरिक आपली कामे करून घेण्यासाठी येत असतात.
तथापि या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाक, खुर्च्या वगैरे कोणतीही आसन व्यवस्था नाही. परिणामी आपली कामे करून घेण्यासाठी तासंतास ताटकळत थांबावे लागते. मला स्वतःला जवळपास 4 तास रांगेत थांबावे लागले आणि इतके करून देखील ऑफिसमधील कर्मचाऱ्याने माझे काम ऐकून न घेता मला उद्या या, असे सांगून माघारी धाडले. हा प्रकार त्यानंतर अनेकदा घडला असून आजतागायत सिटी सर्व्हे ऑफिसशी संबंधित माझे काम झालेले नाही. मालमत्ता वाटणी संदर्भात कोरवी गल्ली अनगोळ येथील एका जागेवर पुन्नाप्पा मल्लाप्पा वाजंत्री, प्रकाश मल्लाप्पा वाजंत्री आणि लक्ष्मण मल्लाप्पा वाजंत्री यांची नावे चढवण्याची आहेत. तेंव्हा सीटीएस नंबर कार्ड ओपन करून ही नावे चढवावीत अशी माझी विनंती आहे.
यासाठी मी एडीएलआर बेळगाव यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी तात्काळ सिटी सर्व्हे ऑफिसमधील दक्षिणचे कर्मचारी प्रवीण कुंदगोळ आणि कोटी यांना माझे काम तात्काळ करून देण्याची सूचना केली होती. मात्र तरीही आजपर्यंत काम झालेले नाही.
मालमत्ते संदर्भातील कामे प्रलंबित ठेवण्याचा हा प्रकार खास करून अनगोळ आणि वडगाव परिसरातील लोकांच्या बाबतीत घडत असल्याचे माझ्या निदर्शनास झाले आहे. तथापि संबंधित कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांमुळे कर्नाटक शासनाची प्रतिमा डागाळत आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना नाहक त्रास -मनस्ताप देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ उचल बांगडी करून त्यांच्या जागी प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या निवेदनात नमूद आहे.