बेळगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांवरील पथदीप बंद अवस्थेत आहेत मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी हायमास्टर दिवे चालू असलेल्या बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर पुन्हा नव्याने एलईडी दिवे बसवण्याचा अजब कारभार महानगरपालिकेकडून सुरू झाल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील ठिकठिकाणीच्या रस्त्यावरील पथदीप बंद अवस्थेत आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये -जा करताना नागरिकांची गैरसोय होते.
यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील त्याची दखल घेण्यास चाल ढकल केली जाते. शहरातील उड्डान पुलांच्या बाबतीतही पथदीप सुरू नसतात अशा तक्रारी आहेत. बी. एस. येडीयुरप्पा मार्ग हा शहराबाहेरील प्रमुख दुपदरी रस्ता आहे. गेल्या कांही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील अर्धे पथदीप सुरू आणि अर्धे बंदावस्थेत होते.
त्यावेळी तक्रार करून देखील कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. कालांतराने सध्या या रस्त्यावरील सर्व हाय मास्टर दिवे सुरू आहेत. मात्र असे असतानाही या ठिकाणी नव्याने एलईडी दिवे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यावरील सर्व पथदीप व्यवस्थित सुरू असताना ते काढून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्या मागे नेमका कोणता शहाणपणा आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तसेच हा भ्रष्टाचाराचा प्रकार तर नाही ना? असा संशय व्यक्त करण्याबरोबरच हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असा आरोप केला जात आहे. नव्याने एलईडी दिवे बसवायचे असतील तर ज्या ठिकाणी खरोखर पथदिपांची गरज आहे, ज्या ठिकाणचे पथदीप बंद आहेत त्या ठिकाणी ते बसवावेत अशी मागणीही केली जात आहे.