बेळगाव महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला तीव्र विरोध करताना घरे रिकामी करून देण्यास नकार देत संतप्त रहिवाशांनी ‘आधी आमच्यावर जेसीबी चालवा, मग आमची घरे पाडा’ असा पवित्रा घेतल्याची घटना आज पहाटे गोवावेस सर्कल नजीक घडली. एवढेच नाही तर यावेळी सत्ताधारी भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे, असा आरोप करत सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, गोवावेस सर्कल परिसरात आज बुधवारी पहाटे कर्णकर्कश आवाज दणाणला. पालिकेच्या खुल्या जागेत अतिक्रमण केलेली घरे हटवण्यासाठी दाखल झालेल्या जेसीबीचा तो आवाज होता. महापालिकेचे अधिकारी भल्या पहाटे कर्मचारीवर्गासह दोन जेसीबींच्या सहाय्याने अनधिकृत घरे पाडण्यासाठी गोवावेस सर्कल येथे दाखल झाले होते. पोलीस बंदोबस्तात त्यांनी घरे पाडण्याची कारवाई सुरू करताच संतप्त झालेल्या रहिवाशांनी घरासमोर ठिय्या आंदोलन केले.
कोणत्याही परिस्थितीत आमची घरे आम्ही पाडू देणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले. याप्रसंगी पोलीस आणि रहिवाशांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. भाजप सरकार मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
दरम्यान आंदोलना वेळी आक्रमक झालेल्या एकाला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर रहिवाशांचा विरोध न जुमानता जेसीबीच्या सहाय्याने 5 हून अधिक घरे, एक गॅरेज आणि गुजरीचे दुकान जमीनदोस्त करण्यात आले. प्रारंभी एक घर आणि आजूबाजूचे शेड पाडण्यात आले. त्यानंतर उर्वरित अतिक्रमणे हटविण्यात आली. पहाटे सुरू झालेली ही अतिक्रमण हटाव मोहीम सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत सुरू होती.
यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना एका महिलेने आम्हाला कोणतीही पूर्व सूचना नोटीस न देता जबरदस्तीने आमचे घर पाडत आहेत. इथे आमचे एकच मुस्लिम घर आहे. आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आम्हाला त्रास देताय का? असा सवाल करून आम्ही 70 वर्षांपासून याच घरात रहात आहोत. मुलांना घेऊन आम्ही आमच्या घरासमोर झोपतो.
आमच्यावर जेसीबी चालून मगच आमचे घर पाडा. आम्ही फार श्रीमंत नाही. लोकांची धुनीभांडी करून जगतो असा संताप तिने व्यक्त केला. महापालिकेच्या उपरोक्त धडक कारवाईमुळे ज्यांची घरे गेली त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या गोवावेस सर्कल नजीकच्या आजच्या अतिक्रमण हटाव मोहिमेप्रसंगी आरपीआय आणि काही मुस्लिम संघटनांनी देखील निदर्शने करून विरोध व्यक्त केला.