दीपावली निमित्त सीमाभागातील बाल मावळे विटा, माती, धान्याची पोती यापासून वेगळ्या प्रकारचे शिवकालीन किल्ले तयार करतात. शहरातील चव्हाट गल्ली येथील बाल मावळे देखील त्याला अपवाद नाहीत, हे मावळे सध्या पारगडाची प्रतिकृती साकारण्यात दंग आहेत.
तोरणा गड, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, नवदुर्ग या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची क्रेझ सीमाभागातील मुलांमध्ये दिसून येते. दसरा परीक्षा संपून दिवाळीच्या सुटट्या लागल्यामुळे सध्या बालचमूंचे हात किल्ले तयार करण्यात व्यस्त झाले आहेत. शहरातील चव्हाट गल्ली येथील मारुती मंगल कार्यालयासमोर गल्लीतील बालगोपाळ सध्या पार गडाची प्रतिकृती साकारण्यात दंग आहेत.
छ. शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम, आदर आणि भक्तिपोटी बेळगावातील अनेक छोटे मावळे शूरवीर बनण्याची तयारी लहानपणापासूनच करत असतात. कोणतेही प्रशिक्षण नाही तरीदेखील एखाद्या अभियंत्यासारखे चव्हाट गल्लीतील मुले किल्ल्याचे काम करीत आहेत.
सगळ्यात देखणा किल्ला आपलाच असावा यासाठी ही बच्चे कंपनी मेहनत घेताना दिसत आहे. ऊन-पाऊस याची तमा न बाळगता सकाळी उठलं की किल्ल्याच्या मागेच. किल्ला तयार झाला की त्यावर महाराजांची मूर्ती, मावळे, मंदिर कमान, घोडा, वाघ याची आकर्षक मांडणी करून हे सवंगडी दिवाळीची सुट्टी आनंदात साजरी करत आहेत.
चव्हाट गल्लीत किल्ला तयार करण्यासाठी प्रताप प्रवीण जाधव, अर्णव शिरवळकर, मल्हार अमर येळ्ळूरकर, दक्ष नेसरकर, वेदांत नितीन जाधव, साहिल जाधव, सुजल होणगेकर, श्रीजीत संतोष नेसरकर, शिवगंध प्रसाद पवार, आदित्य सुनील जाधव, हर्षल कोटद आरव, महेश जाधव, सुयश बंडू शिवणे यासह अन्य बाल मावळे व शिवभक्त परिश्रम करत आहेत.