लेबर कार्ड वाटपाला होणारा विलंब आणि लेबर कार्डधारकांना सरकारी सुविधा मिळत नसल्याच्या विरोधात बेळगावात बांधकाम कामगारांनी आंदोलन केले.
शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांनी बेळगाव येथील कामगार विभाग कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. कामगारांच्या कार्डसाठी अर्ज करूनही त्यांना लवकर कार्ड मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
सध्या ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्यांना सरकारी सुविधाही नीट मिळत नाहीत. शिक्षण सुविधा, लग्नाचे अनुदान, बस पास, किट यासह कोणतेही अनुदान मिळत नसल्याचा संताप कामगारांनी व्यक्त केला.
मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर.लातूर यांनी सांगितले की बेळगाव जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक बांधकाम कामगारांनी नावे नोंदवली असून त्यांना कार्ड मिळाले आहेत.गेल्या महिन्यात कामगार विभागाने कामगारांना बस पास देण्याचा आदेश काढला होता. मात्र आता ती वेबसाईट बंद करण्यात आली आहे. बस पास वाटप तात्काळ सुरु करावे.जिल्ह्यातील सर्व कामगारांना बस पासचे वाटप करण्यात यावे अश्या मागण्या त्यांनी केल्या.
गेल्या वर्षी यशस्विनी पोर्टवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ७० टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली होती. विद्यार्थ्याचे स्टायपेंड देखील सर्वांना वितरित केले जावे. तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना लॅपटॉपचे वाटप करण्यात यावे. विवाह भत्ताही दिला जात नाहीअसाही आरोप त्यांनी यावेळी केला.
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे सुजित मुळगुंद सोमनाथ पाटील, गोरका दौरी, हिरामणी होनगेकर, इराप्पा पाटील, कल्लाप्पा पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले होते.