एक नोव्हेंबर 1956 साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगावसह मराठीबहुलप्रदेश अन्यायाने तत्कालीन मैसूर प्रांतात सामील करण्यात आला. त्यावेळीपासून बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा या मागणीसाठी केंद्र सरकारच्या अन्याया विरोधात दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळादिन सुतकदिन म्हणून पाळला जातो.
काळयादिनाच्या निमित्ताने निषेध करण्यासाठी काळीफिती हातात बांधून भव्य सायकल फेरी बेळगाव शहरात काढली जाते आणि केंद्र सरकारचा निषेध केला जातो.यावर्षीही मूक सायकलफेरी बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात निघणार आहे. उत्तर भागांमध्ये राज्योत्सवची मिरवणूक तर दक्षिण भागात निषेधफेरी असं बेळगाव शहरातले दरवर्षीचे चित्र असते.
किडका साप चावावा आणि दीर्घकाळची जखम कुजत राहावी तशीच सीमावर्ती भागाची झालेली जखम चिघळलेली राहिलेली आहे, गेली 65 वर्ष ही झालेली जखम भरून येत नाही, यावर खपली धरत नाही आणि जखमेतून रक्त वाहायच थांबत नाही. दररोज कर्नाटकी शासनाचा मराठी माणसावर होणारा अत्याचार वेगाने वाढत आहे. मराठी माणसाला डिवचन्याचेही थांबत नाही आणि मराठी माणसाचा अपमान करणेही थांबत नाही.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकार काही करेल असं मराठी जनतेची अपेक्षा असते,पण महाराष्ट्रातील सरकार या घटनेकडे धृतराष्ट्राच्या आंधळ्या भूमिकेतून पाहत असते,त्यांच्या डोळ्याचं आंधळेपणअजून दूर झालेले नाही. सीमा भागातील मराठी जनता मराठीसाठी खस्ता खात असताना महाराष्ट्रातील राज्यकर्ते मात्र या घटनेकडे त्रयस्थ पणाने पाहत आहेत.सीमाभागातील मराठी जनता खूप त्रास सोसत असताना केवळ न्यायालयीन खटल्याच्या कामकाजासाठी वकील नेमणूक करणे, त्यांची फी देणे एवढ्यावरच महाराष्ट्र सरकारने भूमिका संपत नाही, तर त्याने नियमित सीमा वरती भागातील मराठी जनतेचे दुखणं जाणून घेऊन पाठीशी उभा राहणे गरजेचे आहे.
दररोजच्या जगण्यातही मराठी माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं, त्रास सोसावा लागतो,कधी मराठी फलकाचा मुद्दा असू देत किंवा मराठी कागदपत्राचा प्रश्न असू दे अथवा एखाद्या ठिकाणी त्यांना कोणतं सरकारी काम असू दे, किंवा छत्रपती शिवरायांचा अवमानासारख्या घटना असू दे प्रत्येक ठिकाणी मराठी माणसासाला नाडवण्याचा प्रकार रूढ होत चाललेला आहे. अख्खा भारत स्वातंत्र्य भोगत असताना सीमावर्ती भाग रात्र पारतंत्र्यात असल्यासारखा दुःख भोगत खितपत पडला आहे.इंग्रज भारतात असताना कशा प्रकारचा त्रास या देशाला होत होता हे बघायचे असेल, तर सीमावर्ती भागातील जनतेच्या वेदना पाहिल्यावर नक्कीच कळेल.
आज बेळगावच्या छाताडावर विधानसभा उभा करून बेळगाव आमचेच हे दाखवायचा कर्नाटकी प्रशासनाचा प्रयत्न मराठी माणसाला दररोज डोळ्यातून पाणी आणण्यास भाग पाडतो. अशा अनेक घटनेत आया बहिणीनी खाल्लेल्या पोलीसी लाथा आणि काट्याचा मार हा मानवतेच्या दृष्टिकोनातून एक काळाकुट्ट इतिहास आहे. आणि अशा काळापुढे सीमावर्ती मराठी जनता जगत आहे मराठी माणूस दररोज या सगळ्या गोष्टीशी झगडत असताना महाराष्ट्र व केंद्र सरकार काहीच दखल घेत नाही.अनेक वेळा केंद्र शासनाकडे, सरकार दरबारी अर्ज विनंत्या झाल्या न्यायालयाकडे विनंती झाली,न्यायालयानेही आदेश दिले तरीही कर्नाटक प्रशासनाने त्याला हरताळ फासत मराठी जनतेचे खच्चीकरण करण्याचे काम मात्र नेकीने सुरू ठेवले आहे. या सगळ्या घटनांचा क्रम बघता एक बाब आपल्याला लक्षात येईल की सीमावर्ती भागातील मराठी जनता मराठीवर इतके प्रेम करते, शिवरायांच्यावर जीवापाड निष्ठा ठेवते, शिवरायांच्या अभिमानासाठी आणि मराठीच्या स्मितेसाठी सतत झगडत राहते मात्र या सगळ्याला केवळ सीमा भागातील मराठी माणसालाच सोयरसुतक आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना काही लेणं देणं नाही अशी भावना बळावत चालली आहे.
26 मराठी साहित्य संमेलन घेणारे बेळगाव सारखं गाव मराठीचा जागर दररोज तेवत ठेवते.मराठी मरत आहे असा कांगावा करत मराठीचा पुळका दाखवणारे आपली मुले मात्र इंग्लिश शाळेत घालून महाराष्ट्रातीलच मराठीचा हळूहळू ऱ्हास करत असताना. समाज भागातील जनता निष्ठेने मराठी जगावी,मराठी वाढावी यासाठी प्रयत्न करत राहते. सीमाभागातील मराठी जनता ही मराठीचा जागर करणारी जनता आहे आणि ह्या जनतेच्या भावनांचा महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे.ह्या पार्श्वभूमीवर एक नोव्हेंबर चा काळा दिन जो पाळळा जात आहे त्याला केवळ एक दिवसाचा निषेध व्यक्त करून किंवा पोकळ पाठिंबा जाहीर करून थांबता सीमाभागातील मराठी माणसासाठी काय काय करता येईल याचा राजकारण्यांनी विचार करावा आणि कानडी बंधनात अडकून पडलेला हा मराठी भाग महाराष्ट्रात कसा विलीन होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हेच एक नोव्हेंबरच्या या एक दिवसाच्या मूक फेरीने मूक जनता तुमच्यासमोर आव्हान करत आहे. हा मूक आक्रोश महाराष्ट्रातील जनतेच्या कानावर पडेल आणि त्यांच्याकडून कृती घडेल त्याच दिवशी सूदिन उजाडेल!!!