बेळगाव ते धारवाड या कित्तूर मार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी अधिसूचना जारी करून त्यावर आक्षेप मागविण्यात आले असून त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया होणार आहे. सर्व कांही नियोजनबद्धरीत्या झाल्यास 927 कोटी रुपय आराखड्याच्या या रेल्वे मार्गाचे काम 2026 मध्ये पूर्ण होणे शक्य आहे.
बेळगाव ते धारवाड थेट रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. त्याबाबत अधिसूचना घोषित करून आक्षेप मागविण्यात आले आहेत. आक्षेपांवर वेळेत कार्यवाही झाल्यास आरेखन होऊन भूसंपादन प्रक्रिया पार पडेल.
या नव्या रेल्वे मार्गासाठी 927.42 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून यापैकी 20 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. ही रक्कम भूसंपादनासाठी राखीव आहे. तसेच 927 कोटींपैकी प्रत्येकी 50 टक्के रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून मिळणार आहे.
नियोजित बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गाची लांबी 73 कि. मी. राहणार असून दोन टप्प्यात या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. बेळगावहून देसूर, बागेवाडी, एम. के. हुबळी, हुलीकट्टी, कित्तूर, कऱ्याकोप्प मार्गे हा रेल्वे मार्ग धारवाडला जोडण्यात येणार आहे.
बेळगाव ते एम. के. हुबळी दरम्यानचा मार्ग 31 कि. मी. अंतराचा तर एम. के. हुबळी ते तेगूर 24 कि. मी. आणि तेगूर ते धारवाड (कऱ्याकोप्प) 18 कि. मी. अंतर असणार आहे.
या रेल्वेमार्गासाठी बेळगाव ते कित्तूर दरम्यानच्या पट्ट्यामधील सुपीक जमीन भूसंपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.