नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके संघ कुस्ती संघटना नागालँड आयोजित दुसऱ्या खुल्या नागा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी बेळगाव मुचंडी येथील मल्ल पै. अतुल शिरोळे यांची अभिनंदन या निवड झाली आहे.
नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके संघ कुस्ती संघटना नागालँड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान दुसऱ्या खुल्या नागा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अतुल 31 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहेत.
पै. अतुल यांनी यापूर्वी जॉर्जिया व दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तुर्कस्तान येथील स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी नोंदविली होती.
आता नागालँड येथील राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये अतुल हे 90 किलो वजनी गटात खेळणार आहेत.
कुस्ती खेळण्याबरोबरच पै. अतुल शिरोळे हे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खादरवाडी येथील शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. नागालँड येथील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी मल्ल पै. अतुल शिरोळे यांचे खास अभिनंदन करून प्रोत्साहनार्थ आर्थिक सहाय्य केले आहे. दरम्यान उपरोक्त राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल पै. अतुल शिरोळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.