घराच्या छतावर अथवा गच्चीवर धोकादायकरित्या पतंग न उडवता तो खेळाच्या मैदानावर अथवा मोकळ्या जागेत सुरक्षितपणे उडवावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अरबाज दफेदार नावाच्या अकरा वर्षी मुलाचा पतंग उडवताना गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उज्वलनगर परिसरात घडली आहे या पार्श्वभूमीवर प्रसाद चौगुले यांनी वरील प्रमाणे आवाहन केले आहे. सध्या शाळांना दसरा सणाची सुट्टी असल्यामुळे बालगोपाळ विविध खेळांमध्ये दंग आहेत.
विशेष करून बहुतांश मुले घरांच्या छतावर गच्चीमध्ये पतंग उडवण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र बऱ्याचदा ही बाब धोकादायक ठरत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आपल्या परिसरात जनजागृती सुरू केली आहे.
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी शालेय मुलांमध्ये पतंगाबद्दल जनजागृती करताना पतंग उडवण्यासाठी घरावरील छत धोकादायक ठरू शकते. याखेरीज त्या ठिकाणच्या विद्युत खांबाच्या तारा , झाडांच्या फांद्या पतंग बुडवण्यास अडथळा ठरतात.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळाच्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत सुरक्षितपणे पतंग उडविण्याचा आनंद लुटावा, असे आवाहन एका जागृती फलकाद्वारे केले आहे. आपल्या इमारतीच्या ठिकाणी त्यांनी हा जनजागृती फलक उभारला आहे.