भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअर मार्शल मनविंदर सिंग यांनी आज सोमवारी सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलला सदिच्छा भेट दिली.
बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी एअरमार्शल मनिंदर सिंग यांचे स्वागत केले. प्रारंभी ट्रेनिंग स्कूलच्या एअरमन्सनी एअरमार्शल मनिंदर सिंग यांना मानवंदना दिली त्यानंतर सिंग यांचा एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिचय करून देण्यात आला. त्यानंतर एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी एअरमार्शल मनिंदर सिंग यांना बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल बाबत तसेच विशेष करून येत्या 30 डिसेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या अग्नीवीरवायू यांच्या प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीची माहिती दिली.
आपल्या भेटीप्रसंगी एअरमार्शल मनविंदर सिंग यांनी सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल येथील प्रशिक्षणासाठीच्या विविध पायाभूत सुविधांची पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी ट्रेनिंग स्कूलच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एअरमन प्रशिक्षणाच्या पद्धतीतील ठळक बदलांवर भर देताना इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याची सूचना केली.
नव्या प्रशिक्षण पद्धतीचा उद्देश भविष्यातील युद्धांचे आव्हान पेलण्यासाठी सर्वसामान्य रेक्रूटचे परिणामकारक हवाई योध्यामध्ये रूपांतर करणे हा आहे असे स्पष्ट करून अग्नीवीरवायू प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांनी देश भक्ती आणि वचनबद्धता याला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे अशी सूचनाही एअरमार्शल सिंग यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.