Tuesday, November 19, 2024

/

118 वर्षाची परंपरा असलेले झेंडा चौक सार्व. गणेशोत्सव मंडळ

 belgaum

पुण्यानंतर शहरातील मार्केट झेंडा चौक येथे लोकमान्य टिळकांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठा करून देशात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव बेळगाव गावात सुरू झाला. आपली ही परंपरा 118 वर्षे अखंडित सुरू ठेवणाऱ्या आणि अलीकडच्या काळात अनेक उपक्रम राबविणाऱ्या झेंडा चौक मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे आपले एक आगळे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणेशोत्सवाला 1894 मध्ये पुण्यात सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता आणि संघटन करण्यासाठी या उत्सवाच्या व्यासपीठाचा वापर करण्यात आला. बेळगावातील गोविंदराव याळगी आणि लोकमान्य टिळक यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. टिळक बेळगावात आले की याळगी यांच्याकडे वास्तव्य करत. बेळगावातील स्वातंत्र्य लढ्यात उतरलेल्या नागरिकांना पुण्यात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना आवडली.

त्यांनी तशा पद्धतीचा गणेशोत्सव बेळगावातही सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानंतर बेळगावातील मार्केट कांदा मार्केट येथील विष्णू पाटणेकर यांच्या धान्य दुकानात शनिवार दि. 2 सप्टेंबर 1905 रोजी लोकमान्य टिळकांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याद्वारे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

Tilak ganesh bgm
Old pic: bgm lokmanya tilak ganesh mandal

झेंडा चौक मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळांनी यंदा 118 वर्ष पूर्ण केली आहेत. या प्रवासात गणेशोत्सवाची परंपरा कधीच खंडित झाली नाही. सदर मंडळाने 100 वर्षे पूर्ण होताच वर्गणी जमा करणे बंद केले आहे. श्री गणेशाच्या आगमनावेळी पदाधिकाऱ्यांची पारंपरिक वेशभूषा आणि कांही प्रथा यामध्ये आजतागायत बदल झालेला नाही.

डोकीवर पगडी, उपरणे, श्री मूर्तीची पालखी मिरवणूक आणि पारंपरिक वाद्य अशी परंपरा आजही तशीच आहे. गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा मुक्त वातावरण असल्यामुळे या मंडळांनी बाप्पाचे जल्लोषी स्वागत केले. सवाद्य निघालेल्या श्रीमूर्तीच्या आगमन मिरवणुकीच्या अग्रभागी तब्बल 65 जणांचे भव्य झांज पथक होते.Zenda chouk ganesh

बेळगावातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या झेंडा चौक मध्यवर्तीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाबद्दल माहिती देताना श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी म्हणाले, दरवर्षी युवा पिढीला शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व कळावे. त्यांच्या व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी करेला स्पर्धा आणि शरीरसौष्ठव स्पर्धा घेतली जाते. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपताना दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. मागील कोरोना संकटकाळात या मंडळातर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात मद्यपान करून येण्यास बंदी आहे.

गणेशोत्सव काळात मांसाहार निषिद्ध असतो. पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन सदर मंडळातर्फे इतरांप्रमाणे डॉल्बीचा अवलंब केला जात नाही. फटाक्यांच्या आतषबाजीवर तर पूर्णपणे बंदी असते असे सांगून भाविकांना गणेशोत्सवाचा निखळ आनंद लुटता यावा हा या मागचा आमचा उद्देश आहे, असे कलघटगी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.