बेळगाव शहर -उपनगर परिसरात आज सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश रस्ते जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. त्याचबरोबर या पावसाने पुन्हा एकदा स्मार्ट सिटी लिमिटेड पर्यायाने प्रशासनाचा विकास कामाच्या बाबतीतील अवैज्ञानिक दृष्टिकोन व बेजबाबदारपणा याचे पितळ उघडे पाडले आहे.
शहर उपनगर परिसरात आज दुपारी 13 वाजण्याच्या सुमारास जवळपास तासभर मुसळधार पावसाने ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटांसह हजेरी लावली. जोराच्या या पावसामुळे शहर उपनगरातील जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच बरेच रस्ते व सखल भाग जलमय झाला. या खेरीज अर्धवट अवस्थेतील स्मार्ट सिटीच्या विकास कामांच्या ठिकाणचे चिखलाच्या दलदलीचे स्वरूप अधिकच गडद झाले.
शहरात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे गटारी व नाले तुंबून आज दुपारी बी. एस. यडीयुरप्पा मार्ग, काँग्रेस रोड, आचार्य गल्ली आदी रस्ते पाण्याखाली गेले. दुपदरी असलेल्या येडीयुरप्पा मार्गाचा एका बाजूचा रस्ता तर संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे त्या बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या दुपदरी मार्गाच्या एका अंगाने दुतर्फा वाहतूक सुरू होती.
काँग्रेस रोड मार्गावर देखील कांही प्रमाणात हीच अवस्था होती. या ठिकाणीही ठिकठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे संबंधित रस्त्यांवरून ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना विशेष करून दुचाकी स्वारांना जीव मुठीत धरून आपली वाहने जपून चालवावी लागत होती. बेळगाव शहरात या पद्धतीने मुसळधार पाऊस झाला की रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार अलीकडच्या काळात सातत्याने घडत असून याला संपूर्णपणे रस्ते, गटारी, नाले यांचे अवैज्ञानिक विकास कामे कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
खास करून सर्वत्र विकासाच्या नावाखाली गैरसोय निर्माण करणाऱ्या बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला यासाठी जबाबदार धरले जात आहे. एकंदर आजच्या मुसळधार पावसामुळे शहर उपनगरातील जनजीवन कांही काळ विस्कळीत तर झालेच शिवाय बऱ्याच रस्त्यांवर पूरसदृश्य पाण्याने कहर केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.