मंडोळी रोडवरील मून हॉस्पिटलनजीक व्हॅक्सिन डेपो येथील एक मोठा वृक्ष आज सकाळी तडकाफडकी तोडून जमीनदोस्त करण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो येथील वृक्षतोडीस न्यायालयाने मज्जाव केलेला असताना कायदा धाब्यावर बसवून हा प्रकार केल्याचा आरोप होत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. श्रीराम सेना हिंदुस्तानने याचा तीव्र निषेध करत जोरदार आवाज उठवला आहे.
मून हॉस्पिटलनजीक रस्त्याकडेला असलेला व्हॅक्सिन डेपो येथील एक भल्या मोठ्या वृक्षाची आज बुधवारी सकाळी कत्तल करण्यात आली. खाली बुंध्यापासून कापून सदर वृक्षाचे तुकडे करण्यात येत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते वरूण खासणीस यांच्यासह वृक्ष प्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन वृक्षतोडीस विरोध दर्शविला.
दरम्यान, वृक्षतोडीची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, श्रीकांत कुऱ्याळकर, न्यायालयात व्हॅक्सिन डेपोतील बेकायदा वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठवणारे वकील ॲड. किरण कुलकर्णी, ॲड. सतीश बिरादार आदींनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
तसेच बेकायदा वृक्षतोडीस विरोध करून संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत चांगलाच दम भरला. त्यावेळी त्याने आम्हाला परमिशन मिळाली आहे असे सांगून उडवा उडवीची उत्तरे दिली.
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा वृक्षतोड प्रकरणात हस्तक्षेप झाल्याचे समजताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वृक्षतोडीवरून बराच वादंग माजला. पोलिस आल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
अखेर वनखात्यानेच या वृक्षतोडीला परवानगी दिल्याचे समजताच उपस्थित वकिलांसह नागरिकांनी जाब विचारण्यासाठी आता आपला मोर्चा वनखात्याकडे वळविला आहे. खरंतर टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरातील झाडे तोडू नयेत उच्च न्यायालयाचा आदेश आहे. हा आदेश पायदळी तुडवून आज खुलेआम तेथील वृक्षाची कत्तल करण्यात आल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.