बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले रोख 54 हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार आज गुरुवारी घडला असून भर दुपारी घडलेल्या या घरफोडीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी 60 वर्षीय कल्लापा भास्कळ हे त्यांची पत्नी, व मुलासमवेत आज गुरुवारी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून शेतात कामाला गेले होते.
ही संधी साधून शेतीवर उपजीविका करणाऱ्या भास्कळ कुटुंबावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी दुपारी 12 च्या सुमारास घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याच्या कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले रोख 54 हजार रुपये हस्तगत करून चोरटयांनी पोबारा केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून तपास कार्य हाती घेण्यात आले आहे.
भर दिवसा या पद्धतीने घरफोडी झाल्याने बिजगर्णी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ग्रामीन भागात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांना तपास करणे आव्हानाचे ठरले आहे.
यापुर्वीही या भागात अनेक चोर्या व दरोडे पडले आहेत. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांचा आत्मविश्वास वाढला असावा असे नागरिकांतून बोलले जात आहे.
तेच वडगाव ग्रामीण पोलिसांनी वाढत्या चोर्यांना आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करून उपद्रवी चोरटयांना लवकरात लवकर गजाआड करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.