Friday, November 15, 2024

/

हॉस्पिटलमध्ये डांबलेल्या इसमाच्या मदतीला धावले उच्च न्यायालय

 belgaum

हा सावधगिरीचा सल्ला समजा… एक तर या माणसाची कथा तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी भांडण करण्यापासून परावृत्त करेल आणि दुसरी गोष्ट महागड्या हॉस्पिटलपासून दूर राहण्यास प्रवृत्त करेल.

सुजय एसके या कुंबलगौडा बेंगलोर येथील यल्लाप्पा लेआउट येथे राहणाऱ्या विवाहित इसमाची ही कथा आहे. जो पत्नीशी पटत नसल्यामुळे तिच्यापासून वेगळा राहतो. या परिस्थितीमुळे सुजय याने गेल्या 18 ऑगस्ट रोजी नाउमेद होऊन नैराश्येच्या भरात औषधाच्या दहा गोळ्या एकदम खाल्ल्या. मात्र आपली चूक लक्षात येताच त्याने लागलीच एका रुग्णवाहिका चालकाला फोन केला आणि तातडीने त्याला आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. संबंधित चालकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुजय याला रुग्णवाहिकेतून त्वरेने केंपेगौडा रोडवरील ऑलंपस हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

उपचारांती 25 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी सुजयला आयसीयू मधून वार्डमध्ये हलविले. दरम्यान सुजयने हॉस्पिटलचे 60 हजार रुपये भरले. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने सुजयला उपचाराचे 2 लाख 53 हजार 607 रुपये इतके बिल भरण्यास सांगितले. तेव्हा सुजयने आपल्या एका मित्राला बिलाच्या पैशाची व्यवस्था करण्यास सांगितली त्यानुसार त्या मित्राने आरटीजीएस द्वारे पैसे ट्रान्सफर केले. मात्र कांही तांत्रिक समस्येमुळे हॉस्पिटलच्या खात्यावर ते पैसे जमा होऊ शकले नाहीत. दरम्यान हॉस्पिटलने पैशासाठी तगादा लावत सुजयला घरी सोडण्यास नकार दिला. त्यांनी त्याला त्याची मोटरसायकल बिलाच्या रकमेखातर हॉस्पिटलच्या नावे लिहून देण्यास सांगितले.

Hospital file pic
Hospital file pic

हॉस्पिटलचे बिल अदा करण्यासाठीचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर अखेर सुजय एसके याने ॲड. जयशाम जयसिंह राव यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्यावर ओढवलेली बिकट परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. तेंव्हा लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन राव यांनी सुजय याची परिस्थिती पाहून त्याचे वकीलपत्र घेतले. तसेच उच्च न्यायालयात संविधानातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिकाराच्या उल्लंघनाची (हेबियस कॉर्पस) याचिका दाखल केली. या याचिकेची गांभीर्याने दखल घेऊन न्यायालयाने सुजयच्या बाजूने निकाल देत हॉस्पिटलमधून त्याची तात्काळ मुक्तता करण्यात यावी, असा आदेश बजावला. या पद्धतीने अखेर उच्च न्यायालय मदतीला धावून आल्यामुळे ऑलंपस हॉस्पिटलमध्ये डांबलेल्या अवस्थेतेतील सुजयला बाहेर पडून मोकळा श्वास घेता आला.

एक प्रकारे जवळपास 18 दिवसापासून अधिक काळ सुजय एसके यांना बेकायदेशीररित्या हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना साधे अंघोळीला जाऊ दिले जात नव्हते. शिवाय चांगले अन्न व पाणी देखील पुरवले जात नव्हते. ही सर्व परिस्थिती पाहून आम्ही त्यांचे वकीलपत्र हाती घेतले अशी माहिती उच्च न्यायालयाचे वकील ॲड. आदित्य कृष्ण पांडे यांनी दिली. दरम्यान यासंदर्भात ऑलंपस हॉस्पिटलने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.