बेळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे अभ्यास पथक बेळगावात दाखल झाले असून आज शनिवारी त्यांनी विविध ठिकाणी पाहणी दौरा केला.
केंद्रीय जल आयोगाच्या जलशक्ती सचिवालयाचे संचालक अशोककुमार व्ही. यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग खात्याचे अधीक्षक अभियंता व्ही. व्ही. शास्त्री आणि कर्नाटक राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. जे. एस. श्रीनिवास रेड्डी यांचा समावेश आहे. बेळगाव दाखल झालेल्या या पथकाने आज शनिवारी प्रथम पुरामुळे झालेल्या येळ्ळूर रोड परिसरातील पिकांच्या हानीची पाहणी केली. त्यानंतर गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची पाहणी करून आवश्यक माहिती नोंद करून घेतली.
गर्लगुंजी आदर्श मुलांच्या मराठी प्राथमिक शाळेतील 11 वर्ग खोल्यांपैकी 7 खोल्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. येथील एक-दोन वर्ग तर संपूर्ण छत कोसळल्यामुळे उघड्यावर पडले आहेत. यामुळे या शाळेतील कांही वर्ग नजीकच्या समुदाय भवन अथवा सुस्थितीत असलेल्या खोल्यांमध्ये भरवावे लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी दिली. सदर शाळा 65 वर्षे जुनी असून तिच्या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ती क्षतीग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात अभ्यास पथकातील अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी आणि शाळा मुख्याध्यापकांना जाब विचारला आहे. शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीला भेट देऊन पाहणी करणाऱ्या केंद्रीय अभ्यास पथकाने मुलांच्या सुरक्षततेच्या बाबतीत कोणतीच हयगय चालणार नाही. त्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.
गर्लगुंजी येथून तोपिनकट्टी गावाला भेट देणाऱ्या केंद्रीय पथकाने तेथील पावसामुळे कोसळलेल्या चार घरांची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. त्याचप्रमाणे हेम्माडगा रस्त्याची पाहणी करण्याबरोबरच या पथकाने खानापूर गावातील चिरमुरकर गल्ली तसेच अन्य एका गल्लीतील क्षतीग्रस्त अंगणवाडी इमारतीचीही पाहणी करून माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एकूण 355 कोटी रुपयांची हानी झाली असल्याचे सांगितले. केंद्रीय अभ्यास पथकाच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांसह जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.