बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (आरसीयु) विरोधात लढा पुकारताना अनुसूचित जाती -जमातीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कार्यालयासमोर ठिय्या मारून निदर्शने करत धरणे सत्याग्रह छेडला आहे.
बेळगाव तालुक्यातील भूतरामनहट्टी राणी चन्नम्मा विद्यापीठा विरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन हाती घेतले आहे. आज शनिवारी विद्यापीठाच्या दर्शनीय भागासमोर विद्यार्थ्यांनी धरणे सत्याग्रहाला प्रारंभ केला आहे. अनुसूचित जाती -जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत कपात करण्यात आली आहे.
अल्प शिष्यवृत्ती देण्याबरोबरच शैक्षणिक शुल्काची उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांना भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड जात आहे. परिणामी या सर्व प्रकारच्या विरोधात अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठा विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गेल्या दोन दिवसापासून वर्गावर बहिष्कार टाकून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे सत्याग्रह करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यायाची मागणी करत विद्यापीठाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली.
तसेच आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे चन्नम्मा विद्यापीठाचे (आरसीयु) उपकुलगुरू रामचंद्र गौडा यांच्या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.