बेळगाव शहर आणि उपनगरांमधील मटण दुकानदारांना दुकानाला पडदे लावण्याची सूचना करूनही अनेक दुकानदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. दोनवेळा सूचना देऊनही दुकानदारांनी अद्याप पडदे लावले नाहीत.
यानंतर देखील सूचना करण्यात येईल, मात्र सूचना देऊनही पडदे न लावल्यास मटण दुकाने सील करण्यात येतील, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी दिला आहे.
शहरातील मटण दुकानदारांना दुकानात स्वच्छता ठेवावी, मटण ठेवण्यात येते त्याठिकाणी असलेल्या खिडकीला पडदे लावावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या, गणेशोत्सवापूर्वीच अशा सूचना करूनही शहर व उपनगरातील मटण विक्रेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे आता तिसऱ्यांदा मटण दुकानदारांना लेखी स्वरूपात सूचना देण्यात येणार असून या नंतरदेखील मटण दुकानदारांनी दुकानाच्या दर्शनी भागाला पडदे न लावल्यास दुकान सील करण्यात येईल, असा इशारा डॉ. जगदीश जिंगी यांनी दिला आहे.